आर्थिक अडचणीमुळे कारखान्यातच घेतला गळफास
पुलाची शिरोली / वार्ताहर
आर्थिक अडचणीमुळे शिरोली औद्योगिक वसाहतीतील तरुण लघू उद्योजक संदिप महादेव खामकर (वय 35, रा. श्रीरामनगर, शिये, मूळ गाव इदरगुच्ची, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांनी कारखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. नवजीवन लघु उद्योग परिसरात शनिवारी रात्री साडेआठ ते मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संदिप खामकर यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी येथील भाडÎाच्या जागेमध्ये दोन लेथ मशिन घेऊन स्वतःचा लहानसा कारखाना सुरू केला होता. दोन-अडीच वर्षांपासून ते आर्थिक अडचणीत सापडले होते. औद्योगिक मंदी आणि त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटातून त्यांर्चे मानसिक खच्चीकरण झाले होते. काही दिवसानंतर परिस्थिती सुधारेल या आशेवर त्यानी संघर्ष केला. पण सद्या त्यांना कौटुंबिक गरजाही पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागत होती. अशा परिस्थितीत शनिवारी सायंकाळी कंपनीत अचानक काम आले आहे, असे सांगून घरातून जेवणाचा डबा घेऊन कारखाना गाठला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने पत्नीने घरमालकांना विनंती करून कारखान्यात पाठवले. त्यावेळी कारखान्याचे शटर बंद होते. मात्र संदिपची मोटारसायकल बाहेर होती. कारखान्यातील लाईटही सुरू नव्हती. त्यामुळे शंका आल्याने संदिपच्या पत्नीला बोलावून घेतले. कारखान्याचे शटर उघडल्यानंतर संदिपनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर शिरोली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
संदिपचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यना पाच वर्षांची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा आहे. कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह मूळ गावी इदरगुच्ची येथे नेण्यात आला.