ग्रामस्थांनी चोरट्याला केले पोलिसांच्या स्वाधीन
प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराच्या वरील बाजूला असणाऱ्या टेंबे स्वामीच्या मठातील दान पेटीचे कुलुप रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चोरटयाने कटावणीने उचकटून काढले. पेटीतील जमा झालेली रोख रक्कम चोरून ती पिशवीमध्ये भरून घेवून जात असताना देवस्थानचे कर्मचारी आले. त्यावेळी पैशाची पिशवी तेथेच टाकून चोरटयाने पळ काढला होता.
त्यावेळी गावातील अवधूत धनवडे, प्रसाद शेंडगे, निखिल मूळे, साईनाथ वाडेकर, प्रसाद शिंदे, आदित्य मुळे या तरूणांनी रात्री एकच्या सुमारास संशयित चोरटयाला पळून जात असताना पकडून शिरोळ पोलीसांच्या स्वाधीन केले. चोरटयाचे नाव मनोज राजेंद्र पवार असून तो राहणार मिरज तालुक्यातील सावळी गावचा रहिवासी आहे. आज त्याला पोलिसांनी जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत दत्त देवस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी वर्दी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.