कोल्हापूर महानगर शहराध्यक्षपदी अभिजित भोसले यांची नियुक्ती
प्रतिनिधी / कोल्हापूर
संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहर महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी अभिजित भोसले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही माहिती सचिव अभिजित कांजर यांनी एका पत्रकाव्दारे दिली.
डिसेंबर महिन्यात राज्यातील संभाजी ब्रिगेडने कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राज्यातील सर्व जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्तीच्या घोषणा केल्या होत्या. संघटनेला नवीन उभारी देण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात येणार होती. प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सोमवारी जिल्हय़ाच्या कार्यकारिणी जाहीर केल्या.
जिल्हाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची फेरनिवड
शेतकर्यांसाठी केलेले दुधाचे आंदोलन, एमआयडीसी कामगार वर्गासाठी केलेली अनेक आंदोलने, गतवर्षी 2019 मध्ये महापूर परिस्थितीमध्ये केलेले मदतीचे वाटप, विद्यार्थ्यांचे प्रश्न, रेशनचा विषय आदी जनहिताच्या प्रश्नांवर आंदोलन करून ते मार्गी लावण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या रूपेश पाटील यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, रूपेश पाटील यांनी फेरनिवड केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या राज्याच्या पदाधिकार्यांचे आभार मानले आहे. जिल्हय़ाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनहिताच्या प्रश्नांवर लढा देण्याचे कार्य जोमाने करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रूपेश पाटील यांनी दिली आहे.