प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह, संशयित रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचर पॉझिटिव्ह येत आहेत. यामध्ये खासगी डॉक्टर, परिचरही आहेत. खासगी क्षेत्रातील संसर्गित डॉक्टरांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल, वॉर्ड नाही. सीपीआरमधील कोरोना संसर्गित डॉक्टरासाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. पण सीपीआरमधील अन्य स्टाफमधील पॉझिटिव्ह रूग्णांना जनरल वॉर्डमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील दहाहून अधिक डॉक्टर, परिचर पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातील काही केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यातून प्रशासकीय स्तरावर कोरोना योद्धय़ांवरील उपचारांत दरी दिसून येत आहे.
जिल्हय़ात 5 महिन्यांत कोरोनाशी लढा देताना अनेक डॉक्टर, परिचर पॉझिटिव्ह आले. काही डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने हॉस्पिटल बंद ठेवावी लागली. इचलकरंजीतील एक डॉक्टर पॉझिटिव्ह आला, त्याला कोल्हापुरात उपचारार्थ आणले, अनेक हॉस्पिटलची दारे त्याने ठोठावली, अखेर व्हेंटिलेटर वेळेत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. कोल्हापूर मेडिकल असोशिएशनने याची दखल घेतली, त्यातूनच खासगी क्षेत्रातील संसर्गित डॉक्टरांसाठी साथकाळात तरी एखादा वॉर्ड राखीव असावा, अशी संकल्पना जोर धरत आहे.
जिल्हा परिषद व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचर पॉझिटिव्ह आले आहेत, येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीच पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 7 डॉक्टर संसर्गित आहेत. परिचर, अन्य कर्मचारी असे 10 संसर्गित आहेत. या संसर्गित डॉक्टर, परिचरांवर पेंअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. महिला डॉक्टर होम कोरोंटाईन आहेत. नृसिंहवाडी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांत कार्यरत कोरोना योद्धय़ांसाठी त्यांच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये एखादा वॉर्ड राखीव असणे गरजेचे बनले आहे.
सीपीआर हॉस्पिटलवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नियंत्रण आहे. येथील संसर्गित डॉक्टरांसाठी सीपीआरमध्ये ‘सीव्हीटीएस’ वॉर्ड राखीव आहे. येथे संसर्गित 5 डॉक्टरांवर उपचार झाले आहेत, सुरू आहेत. पण याच हॉस्पिटलमध्ये कार्यरत अन्य संसर्गित कर्मचाऱयांना जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू घ्यावे लागत आहेत. ‘सीपीआरमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष पॉझिटिव्ह आला, त्यालाही जनरल वॉर्डमध्येच उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेने प्रशासनातील दुजाभाव दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने सीपीआरमधील कोरोना योद्धय़ांसाठी तरी एकच वॉर्ड राखीव ठेवण्याची मागणी पुढे येत आहे.