‘दख्खन राजा जोतिबा’ मालिकेसाठी निवड
संत बाळुमामा, महात्मा फुलेंच्या यशस्वी भूमिकेमुळे संधी
विजय पाटील / सरवडे
दूरदर्शनवर गाजलेल्या मालिकेतील संत बाळुमामा व महात्मा जोतिबा फुले यांच्या बाल वयातील यशस्वी भूमिका साकारणार्या समर्थ पाटील या बाल कलाकाराची आता ‘दखनचा राजा जोतिबा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेसाठी निवड झाली आहे. विविध वाहिन्यांवरील मालिकेतून घराघरात पोहचलेल्या समर्थ याला बाल जोतिबा साकारण्याची संधी मिळाली आहे. कसदार अभिनयामुळे प्रेक्षकांना आपलासा वाटणारा हा बाल कलाकार २३ ऑक्टोबरपासून जोतिबाच्या भूमिकेतून भेटीला येणार आहे.
येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये आठवीत शिकणार्या समर्थ सागर पाटील याला कोणताही अभिनयाचा अनुभव नसताना ‘बाळुमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेसाठी ऑडिशनमधून संधी मिळाली. संधीचे सोने करून त्याने या मालिकेत संत बाळुमामांची बालपणीची भूमिका हुबेहूब साकारली. कलर्स मराठी वाहिनीवरील हि मालिका लोकप्रिय झाली. त्यामध्ये समर्थही प्रेक्षकांच्या रहदयात उतरला. त्याच्या कसदार भूमिकेचे प्रेक्षकांनी स्वागत केले तर कलर्स वाहिनीने त्याला उत्कृष्ट अभिनयाचा अँवार्ड देवून गौरव देखील केला. त्यानंतर याच वाहिनीवर सुरू करण्यात आलेल्या ‘पुंडलिक हरि दे विठ्ठल’ या किर्तनाच्या मालिकेत त्याला सूत्रसंचालनाची जबाबदारी आली. वय लहान असतानाही त्यांने ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
त्यानंतर सोनी मराठी वाहिनीवरील ‘सावित्री- जोती ‘या मालिकेत थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ती भूमिकाही उत्कृष्टपणे साकारून त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कोणताही अनुभव नसताना तसेच ग्रामीण भागात राहत असताना त्याने बाल वयात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाची दखल घेऊन आता बाल जोतिबा साकारण्याची संधी सिने अभिनेते महेश कोठारे यांनी दिली असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जोतिबा साकारणे भाग्यच !
बाळुमामांसारख्या संतांची तर जोतिबा फुले सारख्या समाज सुधारकांची भूमिका साकारायला मिळणे माझ्या सारख्या नवख्या कलाकाराला अशक्य गोष्ट परंतु परमेश्वरी कृपेने मला ती लाभली याचे समाधान मोठे आहे. आता महाराष्ट्राचे दैवत जोतिबा साकारण्याची संधी प्राप्त झाली आहे. ती भूमिका मी यशस्वी करीनच परंतु अशा भूमिका मिळणे हे भाग्य असून मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक महेश कोठारे यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या यशात आई-वडील, मामा किशोर तोडकर व कुटूंबिय यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.
-समर्थ पाटील