प्रतिनिधी / कोल्हापूर
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच दिवसापूर्वी झालेल्या धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन, एका सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळीत, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या ऐवजापैकी पाच लाखाची रोखडसह सुमारे साडे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिणे आणि ५७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे असा ८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. रविंद्र फडके (वय २०, रा.फडके गल्ली, माणगांव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.
पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजामध्ये सोन्याचा पोहे हार एक, नेकलेस एक, बारशाच्या लहान अंगठया सात नग, मोठी अंगठी एक नग, कुडया व झुबे जोड एक, मोठया रिंगा दोन जोड, लहान रिंगा दोन जोड, कुडया व कानवेल एक जोड, ओम आकाराचे लॉकेट एक असे ५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि चांदीचे दागिण्यामध्ये मोठे पैंजण जोड, लहान मुलीचे पैंजण जोड, बिंदल्या जोड, तोडे जोड, गजे, काजु बिया, वाळे असा ५७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिण्यासह पाच लाखाच्या रोकडीचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सावंत म्हणाले, माणगांव ( ता. चंदगड ) येथील एका बंद घराचे कुलूप काढून, चोरट्याने आत प्रवेश केला. या घरामधील कपाट फोडून सोन्या – चांदीचे दागिण्यासह पाच लाखाची रोकड असा ११ लाख ३४ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत चंदगड पोलिसात २५ ऑगस्टला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा चंदगड पोलीसाच्याबरोबर.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख यांनी समांतर तपास सुरु करण्याबाबत आदेश दिला होता.
त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पो.हे.कॉ. नरसिंग कांबळे, शिवाजी पडवळ, शिवाजी खोराटे, प्रल्हाद देसाई, सचिन देसाई, संजय पडवळ आदीचे एक तपास पथक तयार केले. हे तपास पथक गुन्हा दाखल झालेपासून चंदगड भागात तपास करीत होते. याच दरम्यान ३० ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक सावंत यांना संदेश फडके ( रा . माणगांव , ता . चंदगड ) हा युवक चोरीचे दागिणे घेवून, विक्रीकरीता नेसरी बसस्टँड समोर येणार असल्याबाबतची बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यावरुन नेसरी बस स्टॉप परीसरात सापळा लावून त्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे पाच लाखाची रोकडसह सुमारे साडे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिणे आणि ५७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे असा ८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याविषयी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणगाव गावामध्ये केलेल्या घरफोडीतील असल्याची कबुली दिली. त्यावरुन त्याला अटक करण्यात आली. त्याला चंदगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला चंदगड पोलिसाच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते करीत आहेत.