सीसीआयबीची कारवाई, तिघाजणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
कोल्हापूर सर्कल जवळ असलेल्या स्मोक शॉप या दुकानावर बुधवारी सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी छापा टाकला आहे. या दुकानातून 8 किलो 685 ग्रॅम अंमलीपदार्थ मिश्रीत साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संजीव कांबळे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
कोल्हापूर सर्कलजवळील इंद्रछाया कॉम्प्लेक्समध्ये द स्मोकशॉप आहे. या दुकानात विविध प्रकारचे हुक्का व हुक्कामध्ये ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य विक्री केले जाते. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, चंद्रशेखर निलगार, एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कांबळे, सहय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. मुत्नाळ, ए. के. कांबळे, बी. एन. बळगण्णावर, एस. सी. कोरे, एस. एस. पाटील, सी. जे. चिन्नाप्पगोळ, एम. एम. वडेयर आदींनी ही कारवाई केली आहे.
सलीम मुंडरपाळी अब्दुला (मुळचा रा. मशिरु-मंजेश्वर, जि. कासरगोड, केरळा, सध्या रा. सुभाषनगर), महम्मदअली इब्राहीम (रा. मजलीकमंजीर बायर-मंजेश्वर, सध्या रा. सुभाषनगर), अबुबकर मुप्पीदमेहमुद अड्डतोटे (रा. सोंकल-मंजेश्वर, सध्या रा. सुभाषनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. हुक्का ओढण्यासाठी वापरले जाणारे 8 किलो 685 ग्रॅम वजनाचे 193 पाकिटे व 1400 रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले आहे. या साहित्यात अंमलीपदार्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले.