कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
अत्यावश्यक व जीवनावश्यकसाठी परवानगी असलेल्या दुकानांप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापना (दुकाने) उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनांतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वकूमीवर राज्यामध्ये दि. 05 एप्रिल ते दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत `ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून उर्वरीत सर्व व्यापारी आस्थापना यांना संचारबंदी लागू केलेली आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनांनी कोल्हापूर जिह्यामधील सर्व व्यापारी आस्थापने एक दिवसासाठी बंद ठेवली होती. परंतू, लॉकडाऊनबाबत राज्यातील नागरीक व व्यापाऱ्यांची नाराजी तसेच, कोल्हापूर जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या यांचा विचार करता, उर्वरित सर्व आस्थापने देखील देशाची अर्थव्यवस्था बळकट करणेसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु ठेवणेसाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी. कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन ही दुकाने सुरु ठेवली जातील.
शिष्टमंडळात अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, आनंद माने, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, भरत ओसवाल, संपत पाटील, संभाजी पोवार, जयंत गोयानी, कुलदीप गायकवाड आदींचा समावेश होता.