महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाचे गॅझेट प्रसिद्ध : प्रभाग 8 मधील 1123 मते प्रभाग 9 मध्ये वळवली
राजलक्ष्मीनगर सर्वात मोठा तर शाहू कॉलेज सर्वात लहान प्रभाग
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाचे गॅझेट राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. मदान यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये 81 प्रभागांपैकी 6 प्रभागात मते वळविण्यासंदर्भात बदल करण्यात आले आहे. त्याचा थेट परिणाम 12 प्रभागांवर होणार आहे. सर्वाधिक बहुचर्चित भोसलेवाडी-कदमवाडी प्रभाग क्रमांक 8 मधून तब्बल 1123 मते लगतच्या भोसलेवाडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचबरोबर गॅझेटमधील माहितीनुसार राजालक्ष्मी नगर प्रभाग क्रमांक 70 हा यंदाच्या निवडणुकीतील 7939 मतदार असलेला सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. तर शाहू कॉलेज प्रभाग क्रमांक 10 हा सर्वांत लहान 3738 मतदार संख्येचा प्रभाग ठरला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी 21 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाली होती. महापालिका प्रशासनाने या प्रक्रियेनंतर प्रभाग रचनेचा नकाशा, माहिती आरक्षणासह प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती, सूचनाही मागविल्या होत्या. त्या प्राप्त झाल्यानंतर त्यावर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या समोर 21 जानेवारीला सुनावणीही झाली होती. 26 जानेवारीला महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी सुनावणीवरील अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करत 1 फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षणासंदर्भातील राजपत्र अर्थात गॅझेट प्रसिद्ध केले. त्या गॅझेटमध्ये 81 प्रभागांची सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रारूप प्रभाग रचना अंतिम करताना काही बदलही केले आहेत.
प्रभाग क्रमांक 8 मधील 1123 मते प्रभाग क्रमांक 9मध्ये समाविष्ट
गॅझेटमध्ये मते एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत सर्वसाधारण असणारा भोसलेवाडी -कदमवाडी प्रभाग 8 यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागातील 1123 मते लगतच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असणाऱ्या कदमवाडी प्रभाग क्रमांक 9 मते समाविष्ट करण्यात आली आहेत. आधीच बहुचर्चित असणाऱ्या या प्रभागात राजकीय चुरस वाढणार आहे. शिवाजी विद्यापीठा प्रभाग क्रमांक 64 मधील 524 मते ही राजारामपुरी एक्सटेंशन प्रभाग क्रमांक 39 कडे वळविण्यात आली आहे. भौगोलिक सलगपणाचा विचार या ठिकाणी केल्याचे दिसते. रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक 23 मधील 278 मते शिवाजी पार्क प्रभाग क्रमांक 16 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
सर्वात मोठा आणि सर्वात लहान प्रभाग
राजलक्ष्मी नगर प्रभाग क्रमांक 69 हा प्रभाग सर्वाधिक 7939 मतदारांचा मोठा प्रभाग ठरला आहे. या प्रभागात तपोवन प्रभागातील 622 मते जोडण्यात आली आहेत. शाहू कॉलेज प्रभाग क्रमांक 10 हा सर्वांत लहान 3738 मतदार संख्येचा प्रभाग ठरला आहे.
बाजारगेटमधील 478 मध्ये खोलखंडोबात
शहराच्या मध्यवस्तीतील सर्वात लक्षवेधी हायव्होल्टेज प्रभाग म्हणून बाजारगेट प्रभाग क्रमांक 31 ची ओळख आहे. या प्रभागातील 478 मते लगतच्या खोलखंडोबा प्रभाग क्रमांक 30 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
शिवाजी पेठेत चंद्रेश्वरची 430 मते पद्माराजे उद्यानमध्ये
शिवाजी पेठेतील बहुचर्चित प्रभाग असणाऱ्या चंद्रेश्वर प्रभाग क्रमांक 54 मधील 430 मते शेजारी असलेल्या पद्माराजे प्रभाग क्रमांक 55 वळविण्यात आली आहे.
प्रभाग 18 चा नामविस्तार
रूईकर कॉलनी परिसरातील महाडिक वसाहत प्रभाग क्रमांक 18 याचा नामविस्तार करण्यात आला आहे. महाडिक वसाहत- पाटोळेवाडी या नावाने हा प्रभाग ओळखला जाणार आहे.
महापालिका प्रशासन अनभिज्ञ की…?
राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाचे गॅझेट 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध केले आहे. पण महापालिका प्रशासनाच्या वतीने 3 फेबुवारीला गॅझेट अद्याप प्रसिद्ध झाले नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले होते. गॅझेटची पीडीएफ फाईलही व्हायरल झाली. गॅझेटबाबत महापालिका प्रशासन अनभिज्ञ होते की जाणीवपूर्वक त्याची माहिती देण्यात आली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.