`सीपीआर’च्या प्रसुती विभागाची कामगिरी
6 महिन्यांत 3 हजार गर्भवतींची प्रसुती,
1 हजार सिझेरियन, 2 हजार नैसर्गिक प्रसुती
156 पॉझिटिव्ह गर्भवतींपैकी 55 सिझेरीयन
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोरोनाच्या तणावपुर्ण काळात गर्भवतीही तणावाखाली होत्या, पण सीपीआरमधील प्रसुती विभागाचे समुपदेशन अन् उपचारांमुळे सहा महिन्यांत 3 हजारांहून अधिक गर्भवतींची प्रसुती झाली. त्यापैकी दीडशे गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह होत्या, त्यांची सिझेरियन तंत्राद्वारे सुरक्षित प्रसुती करण्यात आली. कोरोना काळात जीव धोक्यात घालून प्रसुती विभागाने केलेली ही कामगिरी निश्चितच गौरवास्पद ठरली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची साथ सुरू झाली, अन् लॉकडाऊनमुळे कौटुंबिक तणाव वाढत गेला. लॉकडाऊन काळात काही गर्भवती परजिल्ह्यातून सासरी, माहेरी आल्या, कोटेकोर काळजी घेऊनही त्यातील काहींना कोरोनाचा संसर्ग झाला, अशा जिल्ह्यात दिडशे गर्भवतींची कोरोना काळात सीपीआर हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली आहे. समुपदेशनातून गर्भवतींसह त्यांच्या कुंटुबियांचे मनोबल वाढवण्यात स्त्रीरोग, प्रसुती विभागाला यश आले आहे. त्यातूनच जानेवारीपासून आजपर्यत सीपीआर हॉस्पिटलमध्ये तीन हजारांहून अधिक गर्भवतींची सुरक्षितपणे प्रसुती झाली आहे.
मार्चपासून ऑगस्टपर्यत सीपीआरच्या प्रसुती विभागात कोरोना पॉझिटिव्ह 156 गर्भवतींची नोंदणी झाली. त्यापैकी 140 हून अधिक गर्भवतींची प्रसूती सीपीआरमध्ये झाली. त्यातील 55 गर्भवतींची प्रसूती सिझेरियन तंत्राने झाली. याशिवाय 32 गर्भवतींना सेवा रूग्णालयाकडे पाठवण्यात आले. विभागप्रमुख डॉ. शानभाग, डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारीपासून ऑगस्टपर्यत 1 हजारांहून अधिक गर्भवतींना सिझेरियनद्वारे मातृत्वाची संधी या विभागाने योगदानातून दिली आहे. येथे 2 हजार गर्भवतींची नैसर्गिक प्रसुती झाली आहे.
प्रसुती विभागाच्या राखीव वॉर्डमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांवरही उपचार
सीपीआर हॉस्पिटल 1 मार्चला कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल झाले. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत गेली. यावेळी प्रसुती विभागाने हॉस्पिटल प्रशासनाची गरज ओळखून त्यांच्या वॉर्डमधील महिलांसाठी राखीव बेड कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून दिले. याद्वारे या वॉर्डमध्ये 140 कोरोना पॉझिटिव्ह महिला रूग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. शानभाग यांनी दिली.
जानेवारी ते ऑगस्टपर्यत सीपीआरमध्ये झालेल्या प्रसुतीची आकडेवारी
महिना सिझेरियन प्रसुती नैसर्गिक प्रसुती
जानेवारी 234 357
फेब्रुवारी 220 416
मार्च 197 384
एप्रिल 86 144
मे 99 184
जून 122 200
जुलै 90 166
ऑगस्ट 32 16
एकूण 1018 2167