एका रात्रीत 4 बंद घरे फोडली
प्रतिनिधी / कळंबा
साळोखेनगर येथील हडको कॉलनीमध्ये चोरट्यांनी धूमाकूळ घातला. एका रात्रीत 4 बंद घरे लक्ष केली. चारही घरांचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. या 4 घटनांमध्ये 50 हजार हून अधिक रकमेचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना सिसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. परिसरातील एका सिसीटीव्हीमध्ये दोन चोरटे 3 वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रल्हाद इंगळे हे परिवारासह बेळगांव येथे गेल्याने त्यांचे घर बंद आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश केला. तिजोरी फोडून त्यातील दागिने लंपास केले. तर प्रापंचीक साहित्य विस्कटले. परिसरात राहणारे प्रशांत शेटे यांचे दोन मजली घर आहे. वरील मजल्यावर ते झोपले होते. चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. 3 हजार रुपयांचे किरकोळ साहित्यावर डल्ला मारला. शेजारीच राहणाऱया गणेश दळवी यांच्या घरातील लक्ष्मी पुजनाचे साहित्य व चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी लंपास केले. तर सचिन उत्तुरकर यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला पण चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. घटनास्थळी जुना राजवाडा पोलीसांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस तपास करत आहेत.