वाघ ट्रॅपकॅमेऱ्यात कैद
कोल्हापूर : प्रतिनिधी
‘चंदगड कन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये पट्टेरी वाघाने शिकार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा वाघाने शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे चंदगड, तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोन मध्ये वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. शिवाय यावेळी वाघ पाळीव प्राण्यांची शिकार करतेवेळी वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, ‘कन्झर्वेशन रिझर्व्ह’च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला तर गेलाच आहे शिवाय तो संरक्षित सुद्धा झाला असल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दक्षिणेकडील कर्नाटक मधील दांडेली, महाराष्ट्रातील तिलारी, आजरा, चंदगड, विशालगडमार्गे उत्तरेतील चांदोली, कोयनापर्यंत वाघ भ्रमण करीत असतो. राज्य सरकाराने 5 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या ‘आंबोली-दोडामार्ग कन्झर्वेशन रिझर्व्ह’ आणि 22 हजार 523 हेक्टर क्षेत्रावरील ‘चंदगड कन्झर्वेशन रिझर्व्ह’ची घोषणा केली होती. त्यापूर्वी 29.53 चौरस किमीच्या ‘तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह’ची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे या तीनही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास आहे.