10 बेडचा वॉर्ड फुल्ल झाल्याने प्रशासनाचा निर्णय, म्युकर रूग्णांसाठी आज दुसरा वॉर्ड खुला होणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनानंतर म्युकर मायकोसीस रूग्णांत वाढ झाली आहे. सीपीआरमध्ये या रूग्णांसाठी 10 बेडचा स्वतंत्र वॉर्ड केला होता. तो बुधवारी फुल्ल झाला. त्यामुळे गुरूवारी प्रशासनाने 20 बेडचा आणखी एक वॉर्ड म्युकरसाठी उभारण्याचा निर्णय घेतला. मानसोपचार वॉर्डमध्ये आता हा वॉर्ड होणार आहे. त्यासाठी या वॉर्डमधील रूग्णांना गुरूवारी अन्य वॉर्डमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. शुक्रवारी हा वॉर्ड म्युकर रूग्णांसाठी खुला होणार असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
जिल्ह्यात म्युकर मायकोसीसने आजपर्यत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य 5 रूग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. म्युकर रूग्णांत 8 शहरातील तर शिरोळ येथील एक अन् आयजीएम हॉस्पिटलमध्ये एका रूग्णांवर उपचार सुरू आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये म्युकर मायकोसीस रूग्णांसाठी कान, नाक, घसा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
तेथे 10 बेड आहेत. बुधवारी हा वॉर्ड हाऊसफुल्ल झाला. ग्रामीण भागातून म्युकरच्या रूग्णांकडून चौकशी सुरू झाली. नव्याने येणाऱया संशयित रूग्णांवर उपचार कुठे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने गुरूवारी तातडीने आणखी एक 20 बेडचा वॉर्ड म्युकर रूग्णांसाठी उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मानसोपचार वॉर्डमधील रूग्णांना अन्य वॉर्डमध्ये गुरूवारी स्थलांतरीत करण्यात आले. शुक्रवारी येथे म्युकरच्या अन्य संशयित रूग्णांना दाखल केले जाणार आहे.
म्युकर मायकोसीसच्या रूग्णांवर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 10 रूग्णांपैकी 5 रूग्णांची बायोप्सी करण्यात आली. त्यातील डोळयाला संसर्ग झालेल्या एका रूग्णावर गुरूवारी पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अन्य दोन रूग्णांवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान, नाक, घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.