मेरी कॉमच्या आदर्शाने सख्ख्या बहिणींची वाटचाल, गडमुडशिंगीतील आंतरराष्ट्रीय बॉक्सर बनण्याचे लक्ष्य
कोल्हापूर / संग्राम काटकर
गडमुडशिंगीतील ता. करवीर स्नेहा व सायली या दोघी सख्ख्या बहिणी. स्नेहा 8 तर सायली 10 वर्षाची. त्यांना टीव्हीमध्ये पाहिलेल्या जागतिक मुष्ठीयोद्धा मेरी कॉमला पाहून बॉक्सिंगची रुची जडली. त्यानुसार शाळेचा अभ्यास करत रोज सकाळ-संध्याकाळ आर.के.नगरातील कृष्णकल्प बॉक्सिंग अकादमीत सरावालाही सुरुवात केली. देशविदेशातील बॉक्सिंग स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करायचे आहे हे लक्ष्य त्यांनी आपल्या छोट्या वयातच डोळ्यासमोर ठेवले आहे. आई-वडीलही त्यांना रोज सकाळ-सायंकाळी प्रशिक्षणासाठी अकादमीत सोडण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. तेथे या दोघीही वर्कआऊटचा भाग म्हणून 5 किलोमीटर धावणे, ग्लोव्हज् घालून पंच मारणे, विरुद्ध खेळाडूंचा पंच रोखण्याचा सराव सुरु आहे.
कोणताही सराव नसताना गतवर्षी सांगलीतील किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी सायली गेली होती. तेथे मात्र तिच्या वयोगटातील एकही मुलगी नव्हती. त्यामुळेच सायलीला तिच्या गटात विजयी घोषित करुन तिला प्रमाणपत्र देऊन गौरवले. आधी टीव्हीत पाहिलेली आणि आता प्रमाणपत्रावरील मुष्ठीयोद्धा मेरी कॉमचे छायाचित्र पाहून सायली प्रभावित झाली. तीने त्याच क्षणाला बॉक्सर होण्याचा निर्धार करुन वडील सतिश कोरे यांना मी बॉक्सर होणार असे सांगितले. वडीलांनी तू मुलगी आहे, बॉक्सिंग नको असे न सांगता बॉक्सर होण्यासाठीच प्रोत्साहित केले. आर के नगरातील कृष्णकल्प बॉक्सिंग ऍपॅडमीत सरावासाठी तिला दाखलही केले. शिवाय रोज गडमुडशिंगीहून अकादमीत सरावासाठी सोडू लागले. सायलीला सरावास जात असल्याचे पाहून धाकटी बहिण स्नेहालाही बॉक्सर होण्याची इच्छा झाली. मग तिलाही सायलीसोबत सरावाला सोडले जाऊ लागले. सकाळी आई-वडीलांनी मुलींना ऍपॅडमीत सोडणे आणि नंतर घरी घेऊन जाण्याचा दिनक्रम ठरवून घेतला.
रोज सकाळी अकादमीत गेल्यानंतर स्नेहा, सायली 5 किलोमीटर धावण्यासह बॉक्सिंगसाठीचा आवश्यक वर्कआऊट करताहेत. सायंकाळी मात्र प्रशिक्षक ऋतुराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंच मारणे, स्टेपिंग (मैदानात सतत हालते राहणे), विरुद्ध बॉक्सरचा पंच अडवणे, कीटबॅगवर दम लागेपर्यंत पंच मारणे असा सराव करतात. सरावावरुन घरी गेल्यानंतर अंडी आणि घरचं जेवण घेऊन संकेतस्थळांद्वारे स्पर्धांमध्ये बॉक्सरांना मारलेले पंच, डिफेन्स, स्टेपिंग याचाही अभ्यास करुन घरात अडकवलेल्या कीटबॅगवर पंच मारण्याचा थोडा सराव करतात. मोठे झाल्यावर स्नेहा आणि सायलीला शालेय आणि महाविद्यालयीन बॉक्सिंगबरोबरच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही प्रतिनिधीत्व करायचे आहे. सध्या या दोघींनाही मोठÎा स्पर्धा कशा खेळल्या जातात, याची माहिती नसली तरी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्याचे डोळ्यासमोर ठेवलेले लक्ष्य वाखाणण्याजोगे आहे.
कन्यादिनला केली 14 किलोमीटरची धाव…
नुकताच साजरा झालेल्या कन्यादिनाचे औचित्य साधून स्नेहा आणि सायलीने धावा आरोग्यासाठी हा संदेश देत गडमुडशिंगी (ता. करवीर) या आपल्या राहत्या घरापासून आरकेनगरातील बॉक्सिंग ऍपॅडमीपर्यंत धावण्यासाठी पराक्रम केला आहे. धावलेले 14 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी या दोघींनीही 1 तास 40 मिनिटांची वेळ घेतली. शिवाय धावण्याची दोघीमधील क्षमता पाहून आम्हा आई-वडीलांना स्नेहा आणि सायली भविष्यात बॉक्सिंगमध्ये देशाकडून प्रतिनिधीत्व करतील, असा विश्वास आहे. – वडील सतिश व आई सोनाली कोरे