जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय कार्यक्रम
लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, डॉक्टर, सफाई कर्मचारी, कोरोनावर मात करणाऱया कोरोना योध्दय़ांना उपस्थित राहण्याचे आवाहन
कोल्हापूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील तसेच कोरोना योध्दय़ांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले आहे.
शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजण्यापुर्वी किंवा 9.35 वाजल्यानंतर करावा. दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सर्व सार्वजनिक व शासकीय इमातींवर, तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. सामुदायिक देशभक्तीपर गीतगायन, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धा, एखाद्या विषयाचा वेबीनार अशा कार्यक्रमांचे अंतर्भाव असलेले खास कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावे. स्वातंत्र्य दिनाचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याबाबत तसेच कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये फिजिकल अंतर ठेऊन, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने चेहऱयावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला कोरोना योध्दे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह कारोनावर मात केलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे.