प्रधानमंत्री ग्रामसडकमधून 126 कि. मी. रस्त्यांसाठी 70 कोटींचा निधी
40 टक्के निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, खासदार धैर्यशील माने यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 126 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत. यासाठी 70 कोटी रुपयांची तरतुद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेला राज्य सरकारच्या माध्यमातून 40 टक्के निधी देणार आहेत. अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीनमध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 126 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांचा आराखड्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्तावित केले आहे. सदर रस्त्यांची कामे प्राधान्य क्रमानुसार हाती घेण्यात येणार असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी व पन्हाळा तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यातील ग्रामीण व डोंगरी वस्तीतील रस्त्यांच्या बांधणीसाठी भरीव तरतुद करण्यात येणार आहे. रस्ते कामासाठी प्रति किलोमीटर 55 लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. रस्त्यांवरील आवश्यक असणाऱ्या छोठ्या-मोठ्या पुलांची कामेही केली जाणार आहेत. यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणेसाठी मदत होणार असल्याचेही खासदार माने यांनी सांगितले.
तालुकानिहाय रस्त्यांची लांबी हातकणंगले- 17 (किमी.) वाठार ते लाटवडे-5.90 कि.मी., भादोले, किणी, ते जुने चावरे- 10.85 शिरोळ 16 (किमी.) कोंडीग्रे ते कुरडे टारे वसाहत-3.60, दानोळी ते उमळवाड- 3.59, नांदणी ते तेरदाळ- 5.99, निमशिरगाव ते चिपरी- 3.20 शाहूवाडी 31 (किमी.) सावे सावर्डे ते एमडीआर 04- 3.00, एनएच 166 ते परळी निनाई रोड-5.40, साळशी, सुपात्रे ते वारेवाडी रोड-4.27, अमेनी कारंडेवाडी ते माणगाव रोड-7.25, करंजजोशी ते अरुल अंबरडे शिराळे, मलकापूर-4.42 पन्हाळा 19 (किमी.) एमडीआर ते सुर्वेवाडी, माजगाव-3.70 किंमी., वाघीघोळ मंदिर ते कळंबे- 5.00, माले, पोखले, बहिरेवाडी-3.39 वाळवा 23 (किमी.) नेर्ले भये रोड-5.10, नागठाणे आष्टा- 5.00, आष्टा डेक्कन मोलॅसिस रोड-5.00, वाळवा ते आष्टा रोड-7.60 शिराळा 17 (किमी.) खेड धनगरवाडा ते बेलदारवाडी रोड-5.29, चिखली, पाटील वसाहत शांतीनगर-3.30, लाडवाडी- देववाडी रोड-5.0 मिरज 3 (किमी.) नांद्रे ते डिग्रज-3.30 |
पाच वर्षे देखभाल दुरुस्ती
सदर रस्त्यांची पहिल्या पाच वर्षांची देखभाल व दुरूस्ती संबंधीत ठेकेदारांकडून करण्यात येणार असून पुढील पाच वर्षांची देखभाल-दुरूस्ती ही संबंधित विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान 10 वर्षे रस्ते सुस्थितीमध्ये राहतील.
खासदार धैर्यशील माने, हातकणंगले लोकसभा मतदार संघ