प्रतिनिधी / इचलकरंजी
पानपट्टीमधून सिगारेट आणून दिले नसल्याच्या कारणातून कबनूर (ता. हातकणंगले) येथे गांजा पार्टीमधील झिंगलेल्या तिघा नशा बहाद्दरानी दोघा युवकाच्या अंगाचा चावा घेत सशस्त्र हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणातील तिघा संशयितानी एकत्रीत हातात कोयता घेतलेला फोटो मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले असून, हा फोटो मंगळवारी सकाळी व्हायरल झाला आहे.
पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, कबनूर येथील काडाप्पा तळ नावाच्या परिसरात सोमवारी रात्री तिघांनी ओपन गांजा पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये झिंगलेल्या तिघा नशाबहाद्दरानी विकास साळुखे, सुनिल साळुंखे (रा. कबनूर) या दोघा युवकाच्याकडे पानपट्टीमधून सिगारेट विकत घेवून ये, असे सांगू लागले. याला दोघांनीही नकार दिल्याने ‘त्या’ नशाबाजांनी त्याना शिवीगाळ करीत, त्याच्या शरीराचा चावा घेत त्याच्यावर कोयत्याने प्राण घातक हल्ला करून गंभीर केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. याच दरम्यान या प्रकरणातील झिंगलेल्या तिघा जणानी एकत्रीत हातात कोयत्यासारखे शस्त्र घेतलेला फोटो मोबाईलवर स्टेटस म्हणून गेल्या काही दिवसापासून ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. तसेच या तिघा नशाबाजांचा तो फोटो मंगळवारी सकाळी समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे.