प्रारूप मतदार यादीतील चुका, त्रुटी सुधारण्यासाठी महापालिकेने काढला मार्ग
हरकतींवर प्रभाग निहाय होणार पडताळणी : अचूक मतदार यादीसाठी प्रशासनाचे प्रयत्न
संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यातील चुका, त्रुटींमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनावर राजकीय पक्षांसाठी इच्छुक उमेदवारांकडून टिकेची झोड उठविली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीतील चुका, त्रुटी दुरूस्त करण्याबरोबरच प्राप्त झालेल्या हरकतींची तपासणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागांसाठी स्वतंत्र अशा विशेष समितीची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रभागाची संपूर्ण भागयादी आणि प्रभाग यादी ही समिती तपासणार असून त्यानंतर अंतिम मतदार यादी आकारास येणार आहे.
प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याचा अंतिम दिवस मंगळवारी होता. शेवटच्या दिवशी चारही विभागीय कार्यालयात मिळून एकूण 1800 हरकती महापालिकेकडे प्राप्त झाल्या. या हरकतींची तपासणी, पडताळणी करून त्यावरून अंतिम निर्णय घेण्यासाठी महापालिकेने 81 प्रभागात स्वतंत्र अशी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक प्रभागाच्या समितीत कनिष्ठ अभियंता (जेई : ज्युनिअर इंजिनिअर), आरोग्य निरीक्षक (एसआय : सॅनिटरी इन्स्पेक्टर), पर्यवेक्षक (सुपरव्हायजर) आणि बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) यांचा समावेश आहे. या समितीवर पदनिर्देशित अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी असणार असाहे. विशेष समितीतील सदस्यांना जबाबदारीही देण्यात आली आहे. बीएलओ प्रत्यक्ष जागेवर जाऊन मतदाराची माहिती घेऊन तपासणी करणार आहे. बीएलओने केलेल्या तपासणीची पडताळणी सुपरव्हायजर करणार आहे. सर्व्हेअर तांत्रिक बाबी तपासणार आहे. प्रभागातील गल्ली, रस्ता, चौक यामुळे तांत्रिक शंका आल्यास त्याबाबतच्या तपासणीची जबाबदारी सर्व्हेअरकडे राहणार आहे. या सर्वांनी केलेल्या कामावर ज्युनिअर इंजिनिअर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर अंतिम निर्णय घेतील. त्यांच्या नंतर पदनिर्देशित अधिकारी असणारे चारही विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता आणि नियंत्रण अधिकारी असणारे दोन उपायुक्त आणि दोन सहाय्यक आयुक्त यांच्या स्वाक्षरीनंतर अंतिम मतदार यादी आकारास येणार आहे.
समितीकडून अचूक मतदार यादीस मदत
प्रभाग निहाय निर्माण करण्यात आलेल्या विशेष समितीमुळे अंतिम मतदार यादी त्रुटी, चुका दुरूस्त करून अचूकरित्या तयार होण्यास मदत होईल. हरकतदारांच्या हरकती, सूचनांनुसार दुरूस्त्या करणे सुलभ होईल, अशी माहिती प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने दिली.