ऑनलाईन बुकींग ऐवजी थेट केंद्रावर लस मिळणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील 35 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आता ऑनलाईन बुकींग करण्याची गरज नाही. महापालिकेकडून थेट केंद्रावर रजिस्ट्रेशन करुन लस दिली जाणार आहे. महापालिकेकडून तिसऱया लाटेपूर्वी शहरातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टे आहेत. त्यानुसार महापालिकेने दि. 17 पासून 35 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण थेट केंद्रावर रजिस्ट्रेशन करुन होणार आहे. त्यांना कोविशिल्डचा पहिल्या डोस दिला जाणार आहे. तसेच 18 ते 44 वयोगटातील ज्या नागरीकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्टेशन केले आहे.
अशा नागरीकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थनगर, मोरेमाने नगर या केंद्रावर या वयोगटातील लसीकरण होणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झालेल्या नागरिकांना पंचगंगा, कसबा बावडा व कदमवाडी येथील द्वारकानाथ कपूर दवाखाना या ठिकाणी दुसरा डोस देण्यात येणार आहे.
3028 नागरीकांचे लसीकरण
शहरात गुरुवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 हजार 28 नागरीकांना कोव्हिशिल्ड लस देण्यात येणार आहे. यामध्ये 18 ते 45 वर्षापर्यंत 2169 तर 45 ते 60 वर्षापर्यंत 623 नागरिकांना लस दिली.