नीज रांपणकारांचो एकवट संघटनेचा प्रस्ताव
प्रतिनिधी / मडगाव
बाणावली कोळंबी पैदास केंद्राच्या पुनर्विकासासाठी निविदा सादर करण्याची 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर नीज रांपणकारांचो एकवट या संघटनेने आता वरील 10 एकर जमिनीत ‘फिशिंग ऍक्टिव्हिटी व्हिलेज’ उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
बाणावली कोळंबी पैदास केंद्राची संपूर्ण जमीन खासगी आस्थापनाच्या हाती देण्यास विरोध होत असून या पार्श्वभूमीवर पारंपरिक मच्छीमारांनी देखील वरील प्रस्ताव दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष आदेल बार्रेटो यांनी प्रस्तावित फिशिंग ऍक्टिव्हिटी व्हिलेजमध्ये एक फिशिंग बोट पार्किंग शेड, मासे व जाळी सुकविण्यासाठी शेड, दुरुस्ती शेड, कार्यक्षेत्रातील मच्छीमारांना लॉकर्ससाठी जागा, स्वच्छतागृह आणि स्नानगृह, मच्छीमारांचे कपडे इत्यादी ठेवण्यासाठी जागा यांचा समावेश असेल, असे म्हटले आहे.
शिवाय विविध प्रकारचे मासे, पारंपरिक मासेमारी तंत्रज्ञान, पारंपरिक मासेमारीची उपकरणे इत्यादींचे प्रदर्शन तेथे मांडले जाईल तसेच बाणावलीतील मच्छीमारांचा इतिहास जपून ठेवला जाईल. त्यात एक प्रशिक्षण कक्ष, कोळंबीसाठी हॅचरी, एनआरई कार्यालय, फिशिंग कम्युनिटी हॉल असेल. संपूर्ण प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी सौर पॅनल्स बसविली जातील आणि अतिरिक्त वीज शासकीय ग्रीडला दिली जाईल, असे बार्रेटो यांनी प्रस्तावाविषयी माहिती देताना सांगितले.
बाणावली येथील सध्याच्या कोळंबी पैदास केंद्राचा पुनर्विकास करून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर अत्याधुनिक कोळंबी व अन्य मासे पैदास आणि फिन्स फिश हॅचरी उभारण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. मत्स्योद्योग संचालनालयाने या प्रकल्पासाठी नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. मात्र या निर्णयास पारंपरिक मच्छीमारांनी आक्षेप घेतला आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्या, अशी मागणी नीज रांपणकारांचो एकवटच्या झेंडय़ाखाली त्यांनी सरकारकडे केली आहे.