बागायतींसह काही घरांचीही हानी, सुमारे 10 लाखांचे नुकसान
प्रतिनिधी / सांगे
सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास सांगे तालुक्मयातील कोळंब-रिवण येथे अवेळी पडलेल्या पावसामुळे व वादळामुळे मोठय़ा प्रमाणात बागायतींचे नुकसान झाले असून काही घरांची हानी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त बागायतींची पाहणी रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर तसेच सांगेच्या विभागीय कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी केली आहे.
केपेकर व रामनाथ वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगेतील रिवण पंचायत क्षेत्रातील कोळंब येथे सोमवारी संध्याकाळी अकस्मात झालेले वादळ व पावसात सुमारे दहा शेतकऱयांच्या बागायतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, सुपारी, नारळ, काजूची कलमे, आंब्याची कलमे, फणस आदी झाडांची हानी झाली आहे. सुपारीची झाडे, माड, केळी मोडून पडल्या आहेत, तर अन्य झाडांच्या फांद्या मोडून प्रचंड हानी झाली आहे. त्याचबरोबर काही घरांची हानी झाली आहे.
कृषी अधिकारी प्रभुदेसाई यांनी पाहणी करून संबंधितांना शेतकरी आधार निधीच्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज वितरित केल्याचे शेतकऱयांनी सांगितले. सुमारे चार घरे व एका गोठय़ाची हानी झाली आहे. गोठय़ाचे छप्पर उडून गेले व वासे आणि इतर साहित्य गायींवर पडल्याचे वृत्त आहे. शांताराम वेळीप यांचा हा गोठा असून अर्जुन वेळीप यांच्या घरावर माड पडल्याने नुकसान झाले आहे. तर कामू वेळीप यांच्या घराचे छप्पर उडून गेले. अग्निशामक दलाचे जवान सोमवार सायंकाळपासून बचावकार्यात लागले होते. गेले तीन दिवस संध्याकाळी पाऊस पडत असून काही भागांमध्ये वीज गायब होण्याचे प्रकार घडलेले आहेत.