प्रजासत्ताकदिनावेळी संचलनात होणार सहभागी, फलटण तालुक्याला मानाचे कौंदण
विशाल कदम/ सातारा
फलटण तालुक्यातील कोळकी या गावाचा अर्थव मनोज लोहार हा दहा वर्षाचा तबलावादक सध्या मुंबई येथील अंबरनाथ याथल लिववे स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकतो आहे. अवघ्या दहाव्या वर्षामध्ये त्याने दिल्ली मारली आहे. त्याने 2015 मध्ये थायलंड येथे गोल्ड मेडल मिळवले होते. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्काराने त्याचा दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी अर्थवची हजेरी असणार आहे. सातारा जिह्यातील एवढय़ा लहान वयाचा तबलापट्टू म्हणून अर्थवने मारलेली बाजी खरोखरच वाखाण्याजोगी आहे. त्याचे वडिल मनोज शेलार हे रेल्वे पोलीस आहेत. फलटण तालुक्यात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फलटण तालुक्यातील कोळकी या गावातील मनोज लोहार हे पुणे येथे रेल्वे पोलीस म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा अर्थव हा अंबरनाथ येथील लिववे स्कूलमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. त्याला तबल्याचे प्रशिक्षण सुनील शेलार व दिल्ली घराण्याचे पंडित सदाशिव पवार यांनी दिले. अर्थवने वयाच्या दहाव्या वर्षी बरेच काही साध्य केले आहे. तो तबला वाजवण्यास वयाच्या अडीच वर्षापासून शिकला आहे. सध्या तो पाचवीत शिकत असून त्यांने वयाच्या सातव्या वर्षीच 8 वेळा राष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेतला. दिल्ली. लखनो, पुणे, मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर तबला वाजवला. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक ऑलिंपियाड जी थायलंड येथे 2015 ला भरली होती. त्यामध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवले. अर्थवने आपली तबल्यावरील थाप राष्ट्रीय स्पर्धेत दाखवली. मुंबई येथील आकाशवाणी केंद्रावर त्याचे कार्यक्रम झाले आहेत. 60 हून अधिक प्रकारातील तबला तो वाजवतो. त्याला बेस्ट परफॉरमंस अवॉर्ड म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्याचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी दिल्लीत होणाऱया संचलनाच्या कार्यक्रमाला त्याला आमंत्रण आहे.
अथर्वने माझीही मान उंचावली आहे
अर्थवच्या या यशाबद्दल त्याचे वडिल मनोज लोहार यांच्याशी ‘तरुण भारत’ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले, हा माझ्या चिरंजीवाचा सन्मान आहे. त्याने त्याची हुशारी, त्याची तबला वाजवण्याची पद्धत त्याने त्याचे गुरु यांच्याकडून आत्मसात केली. माझीही मान अभिमानाने उंचावली आहे.