वार्ताहर / मिणचे खुर्द
कोळवण (ता. भुदरगड) च्या डोंगरावरील कात्याळावर काडयाजवळ एक मृत बिबट्या सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत बिबट्यास वन विभागाच्या रेस्क्यू टीमने पंचनामा करून दहन केले. नैसर्गिकरित्या बिबट्या मृत झाल्याचे वन विभागातर्फे सांगितले.
भुदरगड तालुक्याच्या वाढत्या व विपुल जंगलात पट्टेरी वाघ, बिबट्या आदी प्राण्यांची संख्या वाढत आहे. गावाशेजारील पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान सहा दिवसापूर्वी कोळवणच्या जंगल हद्दीत सहा ते सात वर्षे वयाचा बिबट्या वाघ सडलेल्या अवस्थेत वन विभागास आढळून आला.
पंचनाम्यात दिलेली माहिती अशी की, सदर बिबटया ७५ टक्के सडलेला असून लिंग कळून येत नाही. पिवळसर तांबूस रंग असून अंगावर काळ्या रंगाचे ठिपके आहेत. त्याच्या नाकापासून शेपटापर्यंतची लांबी २२८ सेंमी भरली. उजव्या पायाची लांबी ४९ सेंमी भरली. पुढील डावा पाय ३७ सेंमी आढळून आला. मागील उजव्या पायाची लांबी ६५ सेंमी तर डावा पाय सडलेल्या अवस्थेत आढळला.
गेल्या आठवड्यापूर्वी ही घटना घडल्याचे वन विभागातर्फे सांगितले. कोल्हापूरच्या वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व त्यांची टीम, वनक्षेत्रपाल किशोर आहिर, वनपाल महादेव डवरी, वनसेवक महादेव करडे, वनरक्षक एम. बी. काशीद, वनमजूर धोंडीराम कांबळे यांच्या उपस्थितीत मिणचे खुर्दचे पशुधन अधिकारी डॉ. शिवलिंग चिकोडे यांनी शव विच्छेदन केले. यावेळी सरपंच सचिन गुरव, पिंटू मोरस्कर, दयानंद गुरव, रामचंद्र गुरव, अनिल ढोले उपस्थित होते. सदर घटनेचा तपास टीओआर नं. डब्लू एल.१०/२० नुसार सुरू असल्याचे वनक्षेत्रपाल श्री. आहिर यांनी सांगितले.