कोवाड/प्रतिनिधी
कोवाड ता. चंदगड येथील भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून सेवा बजावत असलेले जवान संभाजी गोविंद भोगण यांना ऑनरेरी लेफ्टिनेंट पदी बढती मिळाली आहे.
जवान संभाजी भोगण हे मराठा रेजिमेंट बेळगांव येथून 1994 मध्ये सैन्यात दाखल झालेत. त्यांची 1995 मध्ये नागालँड येथे पहिली नियुक्ती करण्यात आली. जम्मू काश्मीर, उरी, पूंच आदी भागात यांनी धाडसी सेवा बजावली. 2007 ते 2008 साली त्यांनी दक्षिण आफ्रिका येथे शांती सेना दलात सहभाग घेतला होता. 2020 मध्ये साहसी कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
दरम्यान, संभाजी गोविंद भोगण यांना ऑनरेरी लेफ्टिनेंट पदी बढती मिळाल्याने प्रजास्ताकदिना निमित्त कोवाड ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जवान संभाजी भोगण तरुण भारत शी बोलताना म्हणाले, सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करणे हे माझे बालपणीचे स्वप्न होतं. मी बारावी झाल्यानंतर स्वप्नाचा पाठलाग केला आणि सैन्यात भरती झालो. 28 वर्षांच्या प्रवासात सैन्याने मला भरभरून दिले आहे आणि मला देशाची सेवा करता आली हे मी माझं भाग्य समजतो असे ते शेवटी म्हणाले.