मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती
भाजपच्या टिकेला दिले प्रत्युत्तर : शिवसेना आमदार, खासदार निधीतून 86 लाखाचा निधी! : जिल्हा वार्षिक योजनेतून 15 कोटी 58 लाख रुपये खर्च!
प्रतिनिधी / मालवण:
कोविड 19 उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम आमदार वैभव नाईक यांनी 25 लाख रुपयांचा निधी स्थानिक विकासमधून दिला आहे. 28 मार्च रोजी त्यांनी हा निधी आरोग्य यंत्रणेसाठी दिला. 31 मार्च रोजी या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा निधी जिल्हा नियोजनमार्फत आरोग्य यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला. नाईक यांनी 2020-21 मध्ये आमदार स्थानिक विकास निधीतून 10 लाखाचा निधी जिल्हा आरोग्य विभागासाठी जि. प.कडे 17 जुलै रोजी दिला आहे. आमदार नितेश राणे वैयक्तिक स्वार्थ जोपासून सर्वात शेवटी कोरोना संपत आल्यावर निधी देऊन आपलेच तुणतुणे वाजवत आहेत. आमदार नाईक यांनी निधी दिला, तेव्हा ते मुंबईत बसून ट्विटरवर टिव टिव करत होते. कदाचित त्यामुळेच त्यांना निधीची माहिती नसावी. शिवसेना आमदारांनी दिलेल्या निधीची माहिती न घेता राणेंनी आपले अज्ञान जनतेसमोर प्रकट केले आहे. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे राणेंनी आपलेच तुणतुणे वाजवू नये. सिंधुदुर्गची जनता सुज्ञ आहे. खोटे बोला पण रेटून बोला ही वृत्ती राणेंनी आता बंद करावी, अशी टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी केली आहे.
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी 2019-20 आमदार स्थानिक विकास निधीतून आरोग्य यंत्रणेसाठी 48 लाख रुपये निधी दिला आहे. खासदार विनायक राऊत यांनी खासदार विकास निधी 2019-20 अंतर्गत 3 लाखाचा निधी दिला. असा एकूण 86 लाखाचा निधी आमदार नाईक व केसरकर, खासदार राऊत यांनी आरोग्य यंत्रणेसाठी दिला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून कोविड 19 उपाययोजनेसाठी 2019-20 मध्ये जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसाठी 7 कोटी 75 लाख 45 हजार रुपये देण्यात आले. त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यासाठी 75 लाख 19 हजार रुपये देण्यात आले. 2020-21 साठी जिल्हा वार्षिक योजनेतून 7 कोटी 83 लाख 71 हजार रुपये देण्यात आले. या अंतर्गत 1 कोटी 23 लाख रुपये आरटीपीसीआर लॅबसाठी, 72 लाख रुपये ऑक्सिजन प्लांटसाठी, 1 कोटी 36 लाख रुपयांमधून व्हेंटिलेटर घेण्यात आले. मल्टिपॅरा मॉनिटर, इन्फ्युजन पंप, कोरोना टेस्टिंग किट, ऑक्सिजन सिलेंडर किट, औषध पुरवठा, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पीपीई किट, एन 95 मास्क, ट्रिपल लेअर मास्क, सॅनिटायझर आदींसाठी हा निधी खर्च करण्यात आला. असे एकूण 15 कोटी 58 लाख 63 हजार जिल्हा वार्षिक योजनेतून कोविड 19 उपाययोजनेसाठी देण्यात आले, असे खोबरेकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत
राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. तसेच ट्रनेट व सीबीनेट मशीन देण्यात आले. फॉवलर मेट्रेस बेडसाठी 1 लाख 99 हजार रुपये देण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कन्सन्ट्रेशनची 4 उपकरणे देण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये कोविडसाठी 1 कोटी 71 लाख 10 हजार रुपये जिल्हय़ासाठी उपलब्ध झाले. त्यातील आजपर्यंत 1 कोटी 53 लाख 78 हजार रुपये खर्च करण्यात आले. यातील 12 लाख 49 हजार 500 रुपये अँटीजेन टेस्टसाठी देण्यात आले. ऍक्रोलिक सीट, कोविड रुग्नग्णांना जेवण, कोविड सेंटर उपाययोजना, क्वारंटाईन सेंटर उपाययोजना, इतर जिल्हा, परराज्यातील मजुरांसाठी कॅम्प, कोविड रुग्णांना नेण्यासाठी गाडय़ांची व्यवस्था, यासाठी खर्च करण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
नारायण राणेंनी निधी का दिला नाही?
कोकणचे स्वयंघोषित भाग्यविधाते समजणारे खासदार नारायण राणे यांनी 2019-20 व 2020-21 मध्ये आपल्या खासदार निधीतून एक नवा रुपयाही जिल्हय़ाला कोविडसाठी दिलेला नाही. जर राणेंना सिंधुदुर्गच्या जनतेची एवढी काळजी असती, तर कोविडसाठी निधी का दिला नाही हे त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे. शिवसेना पालकमंत्री उदय सामंत तसेच राऊत, नाईक, केसरकर यांनी आवश्यकतेनुसार जिल्हय़ात वेगवेगळ्य़ा माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अँब्युलन्सही जिल्हय़ासाठी उपलब्ध केली आहे. पाठपुरावा करून रेमडेसीवीर इंजेक्शन्स उपलब्ध करण्यात आली. रिक्षा व्यावसायिक, दशावतारी कलाकार, सलून व्यावसायिक, गरजू व्यक्ती इतर ठिकाणी नोकरी शिक्षणानिमित्त अडकलेल्या जिल्हय़ातील लोकांना धान्य वाटप, आर्थिक स्वरुपातही शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली. त्यामुळे नितेश राणेंनी दिलेल्या तुटपुंजा निधीचा गाजावाजा करू नये व शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेला उपलब्ध झालेल्या निधीची माहिती घेऊन अभ्यासपूर्वक टीका करावी, असा सल्ला खोबरेकर यांनी राणेंना दिला आहे.