ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकार येत्या 10 जुलै पर्यंत देशात कोविड कवच पॉलिसी अथवा कोविड वैद्यकीय विमा पॉलिसी आणणार आहे. त्यादृष्टीने विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने देशातील विमा कंपन्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
आयआरडीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड कवच पॉलिसी साडेतीन, साडेसहा अथवा साडेनऊ महिन्यांची असावी. या पॉलिसीसाठी विमा रक्कम 50 हजार ते 5 लाख असावी. तसेच या पॉलिसीसाठी देशभरात एकच प्रीमियम ठेवण्यात यावा. इतर सामान्य पॉलिसी प्रमाणे भौगोलिक स्थानानुसार अथवा प्रदेशानुसार प्रीमियम बदलू नये.
आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्यांनी 10 जुलैपूर्वी अशा पॉलिसी उपलब्ध करून द्याव्यात. या पॉलिसीत कोविड रुग्णांच्या उपचारांचा आणि इतर आजारांच्या उपचारांचा खर्च समाविष्ट असावा, असेही आयआरडीएने स्पष्ट केले आहे.