चिंचाळवाडा, खारेबांद येथे रुग्ण सापडल्याने निर्जंतुकीकरण मोहीम
प्रतिनिधी / मडगाव
आपल्या प्रभागात चिंचाळवाडा, खारेबांद, कालकोंडा अशा भागांमध्ये कित्येक कोविडबाधित सापडल्याने त्यांना आपण सेवाभावी वृत्तीने मदत पुरविली व फवारणी मोहीम राबविली. नगरसेवक म्हणून ते आपले कर्तव्य होते, अशी प्रतिक्रिया नगरसेवक मनोज मसूरकर यांनी व्यक्त केली आहे.
खारेबांद व चिंचाळवाडा येथे काल प्रत्येकी 1 रुग्ण सापडल्याने आपण संबंधित परिसरांत मडगाव पालिकेची फवारणी पथके घेऊन निर्जंतुकीकरण मोहीम राबविल्याची माहिती मसूरकर यांनी दिली. वरील भागात काही समाजसेवक फवारणी करत असल्याकडे मसूरकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सध्या महामारीचा प्रकोप आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण स्थानिक नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागात आवश्यक उपाययोजना राबवत आहे. यात कोणतेही राजकारण आपल्याला करायचे नाही. राजकारण निवडणुकीच्या वेळी करण्यास चांगलाच वाव आहे.
नगरसेवक म्हणून या कोविडच्या काळात आपण आपल्या प्रभागात चोख कामगिरी बजावत असून स्थानिक आमदार दिगंबर कामत यांचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे मसूरकर यांनी नजरेस आणून दिले. चिंचाळवाडा येथे मोठय़ा प्रमाणात कोविडबाधित आढळले असून रुग्णांची संख्या 18 च्या घरात पोहोचली आहे. खारेबांद येथे मंगळवारी दुसरा रुग्ण आढळला. चिंचाळवाडा येथील सुमारे 20 जणांची चाचणी मंगळवारी करण्यात आली असून अहवाल प्रलंबित आहेत. कालकोंडा भागात आपण त्वरेने निर्जंतुकीकरण मोहीम राबविली व चाचण्या करून घेण्यासाठी येथील रहिवाशांना बस उपलब्ध करून दिली. आवश्यक उपाययोजनांमुळे येथे कोविडचा फैलाव नियंत्रणात ठेवणे शक्मय झाले. चिंचाळवाडा येथे अचानक आणि एकाच वेळी फैलाव झाल्याने रुग्ण वाढले. आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन आपण केले आहे, असे नगरसेवक मसूरकर यांनी स्पष्ट केले.