जिल्हाधिकाऱयांकडून मतदान केंद्राची पाहणी
बेळगाव : कोविडमुळे मतमोजणीसाठी अतिरिक्त खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये सात टेबलची व्यवस्था केली आहे. कोविडचे सर्व नियम पाळण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अधिकाऱयांनी कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा न करता कोविडचे नियम काटेकोर पाळावेत, असे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी अधिकाऱयांना सांगितले.
शहरातील आरपीडी महाविद्यालयात 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार यांनी भेट देऊन केंद्राच्या तयारीचा आढावा घेतला. लोकसभेच्या 8 मतदार संघातील मतमोजणीसाठी सर्व तयारी केली आहे. मागीलवेळी प्रत्येक विधानसभा मतदार संघाला केवळ एकच खोली देण्यात आली होती आणि त्या खोलीमध्ये 14 टेबलची व्यवस्था केली होती. मात्र आता एका खोलीमध्ये सात टेबल ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त खोल्याही उपलब्ध केल्या आहेत. कोविडचा संसर्ग वाढल्यामुळे सर्व नियम कठोरातकठोर पाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता संजीवकुमार हुलकई यांनी जिल्हाधिकाऱयांना माहिती दिली. त्यांच्यासोबत अप्परजिल्हाधिकारी योगेश्वर, साहाय्यक निवडणूक अधिकारी जगदीश के. एच., सी. बी. कोडली, प्रांताधिकारी अशोक तेली उपस्थित होते.