प्रतिनिधी/ दापोली
जिल्हय़ात कोरोना रूग्णांची वाढू लागल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. एकीकडे कोरोनाबाधितांकडे नातेवाईकही दुर्लक्ष करीत असताना कोविड योद्धे मात्र त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावत आहेत. दापोलीचा विशाल नलगे हे त्यापैकीच एक नाव आहे. डॉक्टर उपलब्ध नसताना व कोणतीही सुरक्षिततेची साधने नसताना दापोली येथून युवासेनेच्या रूग्णवाहिकेतून रूग्णाला रत्नागिरीत नेणाऱया विशालचे धाडस आज कौतुकाचा विषय ठरत आहे.
दापोलीतील युवासेनेच्या रूग्णवाहिकेसाठी अचानक कॉल आला. कोरोना संशयित रूग्णाला घेऊन रत्नागिरीला जायचे होते. आधीच दापोलीतील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण कोविड योद्धा विशाल नलगे मागे हटला नाही. तो धाडसाने रत्नागिरीला रवाना झाला. सोबत डॉक्टर नव्हता. पीपीई कीट, हातमोजे अथवा अन्य सुरक्षिततेची साधने नव्हती. तरीही विशाल डगमगला नाही. गाडीसोबत असलेल्या आकाश रेळेकर याला घेऊन त्याने प्रवास सुरू केला.
संगमेश्वर येथे रूग्णाची प्रकृती गंभीर झाली. रूग्णवाहिकेबरोबर डॉक्टर नसल्याने प्रसंग बाका होता. यावेळी विशालने आपला अनुभव पणाला लावत या रूग्णाला ऑक्सिजन लावून सुरक्षितरित्या व वेळेत रत्नागिरीत पोहोचवले. या रुग्णाला डेंग्य़ूसोबत कोरोनाचे निदान झाले. पण विशालच्या प्रसंगावधानामुळे वेळेत उपचार झाल्यामुळे या रुग्णाचे प्राण वाचले. याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी या कोविड योद्धय़ाचे आभार मानले. आरोग्य विभागाच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून ही जबाबदारी या कोविड योद्धाने अत्यंत चोख कामगिरी बजावल्याने अनेकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कामगिरीबद्दल त्यांचा यथोचित गौरव शासनाने करावा, अशी मागणीही होत आहे.