सरकारने निवासाची व्यवस्था काढल्याने निर्णय
प्रतिनिधी/ मडगाव
कोरोना रुग्णांची सेवा करणाऱया निवासी डॉक्टरांना राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या सुविधा मागे घेण्यात आल्याने अखेर निवासी डॉक्टरांनी काल सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून आपली सेवा मागे घेतली. त्यामुळे मडगावच्या इएसआय कोविड-19 हॉस्पिटल तसेच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळावर परिणाम झाला. त्यात इएसआय कोविड हॉस्पिटलात अतिदक्षता विभागात डॉक्टरांची नितांत गरज असताना हा प्रकार घडल्याने सर्व सामान्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत.
सरकारने कोरोना रुग्णांची सेवा करणाऱया निवासी डॉक्टरांना मडगाव परिसरातील विविध हॉटेलांत खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या. या खोल्या रविवारपासून खाली करण्याचा आदेश प्रशासकीय पातळीवरून निघाला होता. डॉक्टरांना हॉटेलात खोल्या पाहिजे असेल तर त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे, असे स्पष्टपणे कळविण्यात आल्याने, निवासी डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मुख्यमंत्र्यांचे कोणतेच भाष्य नाही
गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (जीएआरडी) ने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना निवेदन सादर करून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच कोरोना रूग्णांची सेवा बंद केली जाणार असल्याचे कळविले होते. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांकडे नेला होता. मात्र, काल सोमवारपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतेच अधिकृत भाष्य केले नव्हते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून निघालेला आदेश अंतिम असल्याचे स्पष्ट झाले होते.
हॉटेल्सकडून डॉक्टरांकडे पैशांची मागणी
रविवारी हॉटेल्समध्ये थांबलेल्या डॉक्टरांकडून हॉटेल्सच्या व्यवस्थापकांनी पैशांची मागणी केल्याने निवासी डॉक्टरांमध्ये खळबळ माजली व त्यांनी सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून इएसआय कोविड हॉस्पिटल तसेच दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलातील डॉक्टरांनी रूग्णांची सेवा बंद करून गोमेकॉत जाणे पसंत केले. राज्य सरकारने पूर्वी प्रमाणेच निवासस्थाने चालू न ठेवल्यास कोविड-19 रुग्णालयांमधून सेवा मागे घेण्याचा इशाराही दिला आहे.
कोविड हॉस्पिटलवर परिणाम शक्य
निवासी डॉक्टरांनी इएसआय कोविड हॉस्पिटल तसेच दक्षिण गोवा जिल्हा कोविड हॉस्पिटलात रूग्णांसाठी चांगली सेवा दिली होती. मात्र, काल सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून ही सेवा बंद केल्याने, या दोन्ही कोविड हॉस्पिटलांवर जबरदस्त परिणाम होण्याची शक्यता आहे. खास करून इएसआय हॉस्पिटलात अतिदक्षता विभाग असून या ठिकाणी डॉक्टरांची उपस्थिती असणे महत्वाचे मानले जाते…
अतिदक्षता विभागातील रूग्णांचे काय होईल
अतिदक्षता विभागात कोरोनाचे गंभीर अवस्थेतील रूग्ण ठेवले जातात. त्याची देखभाल करणे खुपच महत्वाचे असते. अशा वेळी निवासी डॉक्टरांनी आजवर चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मृत्यूच्या जबडय़ात पोचलेले अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत जाऊ शकले होते. मात्र, कालपासून डॉक्टरांनी माघार घेतल्याने, अतिदक्षता विभागातील रूग्णांचे काय होईल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेणारे रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांवर मोठे संकट कोसळले आहे.
अतिदक्षता विभागात एकच डॉक्टर उपलब्ध
निवासी डॉक्टरांनी माघार घेतल्यानंतर इएसआय हॉस्पिटलचे डॉ. ग्लेडविन हे एकटेच काल अतिदक्षता विभागातील रूग्णांच्या मदतीला पोचले. डॉ. उदय काकोडकर हे सुद्धा अतिदक्षता विभागावर लक्ष ठेऊन होते. मात्र, एकमेव डॉक्टर दिवस-रात्र कसे काय रूग्णांसाठी उलपब्ध होतील असा सवाल सुद्धा काल उपस्थितीत झाला होता.
दोन्ही हॉस्पिटलांवर येणार ताण
निवासी डॉक्टरांनी माघार घेतल्याने, इएसआय हॉस्पिटलातील डॉक्टरांची जबाबदारी वाढली आहे. निवासी डॉक्टर व इएसआयचे डॉक्टर मिळून कोविड हॉस्पिटलातील रूग्णांची सेवा करीत आले होते. दक्षिण गोवा जिल्हा कोविड हॉस्पिटलावर अधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी अधिकतर डॉक्टर हे निवासी डॉक्टरच होते. या ठिकाणी हॉस्पिसियो इस्पितळातील डॉक्टरांना पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
आजपासून दिसणार मोठे परिणाम
सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत निवासी डॉक्टरांनी आपली सेवा कोविड हॉस्पिटलासाठी दिली होती. त्यामुळे काल विशेष असा परिणाम दिसून आलेला नव्हता. मात्र, आज मंगळवारपासून दोन्ही कोविड हॉस्पिटलावर परिणाम होईल असे संकेत मिळत होते.
कोविड हॉस्पिटलातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ. उदय काकोडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भाष्य करण्यास नकार दर्शविला. गोमेकॉचे डिन डॉ. बांदेकर हेच अधिक माहिती देऊ शकतील असे ते म्हणाले. तसेच इएसआयचे प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असा, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कोविड हॉस्पिटलात औषधांची कमतरता
हाती आलेल्या माहिती प्रमाणे, इएसआय कोविड हॉस्पिटलात गेल्या काही दिवसांपासून औषधांची कमतरता भासत आहे. खास करून अतिदक्षता विभागातील रूग्णांसाठी आवश्यक औषधे मिळत नाही. त्या बदली पर्यायी औषधे पुरविण्यात येत असली तरी त्याचा रूग्णांवर विशेष असा परिणाम होत नाही. त्यामुळे रूग्णांच्या आरोग्याला धोका देखील असतो. डय़ुटीवरील डॉक्टर रूग्णांसाठी औषधे लिहून देतात. पण, ही औषधे उलपब्ध नसल्याने पर्यायी औषधे पुरविण्यात येतात. जर या संदर्भात विचारणा केली तर आहे त्याच पद्धतीने कामकाज पुढे न्यायला पाहिजे असे सांगितले जाते. त्यामुळे सद्या तरी कुणी काही विचारण्याच्या भानगडीत पडत नाही.
कंत्राटवरील कामगारांना अद्याप वेतन नाही
इएसआय कोविड हॉस्पिटलात अनेक कामगार कंत्राटपद्धतीने घेण्यात आलेले आहेत. पण, त्यांना अद्याप वेतन दिलेले नाही. त्यामुळे या कामगारांची परिस्थिती बिकट झालेली आहे. बरेच कामगार हे सत्तरी, धारबांदोडा, सांगे इत्यादी भागातून आलेले आहेत. त्यात खोल्या खाली करण्याचा आदेश देण्यात आल्याने, त्याची परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे.
कॅज्युल्टी विभागात मुक्काम करा
सद्या कंत्राटी कामगार तसेच नर्सेस यांना पुरविण्यात आलेल्या खोल्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना इएसआय कोविड हॉस्पिटलाच्या कैज्युल्टी विभागात मुक्काम करावा असे सांगण्यात आले आहे. कॅज्युल्टी विभागात असलेल्या रूग्णांना हॉस्पिटलाच्या अन्य मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. कॅज्युल्टी विभागात मुक्काम करण्यास सांगितल्याने कंत्राटी कामगार बरेच नाराज झालेले आहेत. अनेकांनी तर काम सोडून जाण्याचा विचार सुरू केला आहे.