प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात उपचार घेणारा एक रुग्ण काल सकाळी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने सर्वांची नजर चुकवून पळून गेला. पण, त्याच्या हाताला वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुई टोचली होती. त्यामुळे तो कोविडचा रुग्ण असल्याचे लक्षात आले. नंतर हॉस्पिटलच्या दोन सेक्युरीटी गार्ड व पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणले.
कोविड हॉस्पिटलातील काही रुग्ण रस्त्यावर येत असल्याची चर्चा यापूर्वी देखील झाली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद गांवस यांच्याशी संपर्क साधून गेटवर तैनात करण्यात येणाऱया पोलिसांना दक्ष राहण्याचा आदेश दिला होता. या हॉस्पिटलच्या बाजूलाच आझाद नगरी असून रुग्ण चहा पिण्यासाठी बाहेर आल्यास या नगरीला धोका असल्याची कल्पना दिली होती.
काल तर एका रुग्णाने कहरच केला. हाताला सुई टोचली असताना देखील तो हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने बाहेर पडला. मागच्या बाजूला सेक्युरिटी नसल्याची संधी त्यांने साधली. पण, त्याच्या हातावर सुई टोचलेली असल्याने, तो रुग्ण असल्याची कल्पना इतरांना आली व त्यांनी सेक्युरिटीकडे संपर्क साधला. नंतर दोन सेक्युरिटी व डय़ुटीवर एक पोलीस यांनी त्याचा पाठलाग करून त्याला नावेलीच्या जवळ ताब्यात घेतले व पुन्हा कोविड हॉस्पिटलमध्ये आणले. याच रूग्णाने हॉस्पिटलात नर्सेसवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती हाती आली आहे. संडासातील ब्रश घेऊन तो नर्सेसना मारहाण करायला गेला होता. मात्र सतर्क झालेल्या नर्सेसने त्याचा हा डाव हाणून पाडला होता.