आई कोविडमध्ये, बाळ गोमेकॉत
प्रतिनिधी / मडगाव
कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित झालेल्या एका गरोदर महिलेने शुक्रवारी सायंकाळी एका मुलीला जन्म दिला. या महिलेची सिझेरियन करावी लागली. ही महिला शुक्रवारीच कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. संध्याकाळी तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्यानंतर सिझेरियन करण्यात आले. कोविड हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म होण्याचा ही पहिली घटना आहे.
ही महिला मांगोरहिल-वास्को येथील असून खबरदारीचा उपाय म्हणून बाळाला गेमेकॉच्या पेडियाट्रिक विभागात दाखल करण्यात आले आहे. या महिलेचे हे चौथे मूल असून तिच्या अन्य तीन मुलांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. अंकिता सिनाय बोरकर यांनी ‘सिझेरियन’ केली. त्यांना गोमेकॉच्या पेडियाट्रिक टीम तसेच इएसआय हॉस्पिटलच्या टीमचे सहकार्य मिळाले.
या नवजात बालकाची 48 तासानंतर कोरोना चाचणी घेतली जाणार असून ही चाचणी निगेटिव्ह आल्यास बाळाला नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाईल आणि जर ते पॉझिटिव्ह आले तर आईकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.
या इस्पितळात अन्य एक गरोदर महिलेसही दाखल करण्यात आले असून तिही मांगोरहिल भागातीलच आहे.
दरम्यान, कोरोना फैलावण्यास जबाबदार असलेल्या ’त्या’ मासे विक्रेत्याचे पूर्ण कुटुंबच सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.