रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्के, मृत्यू येण्याचे प्रमाण 6 टक्के
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात काल शनिवारपर्यंत 105 जणांचा बळी गेला आहे. या हॉस्पिटलात 22 जून रोजी कोरोनाचा पहिलावहिला बळी केला होता. त्यानंतर बळी जाण्याची मालिका ही अखंडितपणे सुरू आहे. काल शनिवारी आगाळी-फातोर्डा येथील 68 वर्षीय रिक्षाचालकाचा बळी गेला. तो 105 बळी ठरला. या हॉस्पिटलात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 79 टक्के आहे तर बळी जाण्याचे प्रमाण 6 टक्के आहे.
कोविड हॉस्पिटलात सुरुवातीला मुरगाव तालुक्यातील रुग्ण मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. मांगोरहिल-वास्को येथून कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर याच भागातून रुग्ण मोठय़ा संख्येने दाखल होऊ लागले. तसेच बळी जाण्याचे प्रमाणही वास्कोतच जास्त होते. मात्र, आता मुरगाव तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. आता सासष्टी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. तसेच कोरोनाचे बळी जाण्याचे प्रमाणही सासष्टी तालुक्यात वाढले आहे.
खासगी हॉस्पिटलात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून घेण्यास मान्यता देण्यापूर्वी अनेक महनीय व्यक्ती या हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल झाल्या. काहीचे बळी गेले तर काही बरे होऊन आपल्या घरी परतले. बरे झालेल्या महनीय व्यक्तीमध्ये कुंकळळीचे आमदार क्लाफास डायस, माजी आमदार जुझे फिलीप डिसोझा इत्यादीचा समावेश आहे. माजी पोलीस अधीक्षक टॉनी फर्नांडिस यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे. पण, सध्या त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. तर महनीय व्यक्तीचा बळी जाणाऱयामध्ये माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर, वास्कोचे नगरसेवक पास्कोल डिसोझा, कुंकळळीच्या माजी उपनगराध्यक्ष मीना फर्नांडिस, माहिती खात्याचे अधिकारी धनंजय गाड केरकर इत्यादीचा समावेश होता. कोविड हॉस्पिटलात बळी जाण्याचे प्रमाण हे 6 टक्के आहे.
1155 रुग्ण झाले बरे
कोविड हॉस्पिटलातून आतापर्यंत 1155 रुग्ण बरे झालेले आहेत. 1155 पैकी 605 रुग्णांना थेट कोविड हॉस्पिटलातून डिस्चार्ज देण्यात आला तर 550 जणांना ‘ट्रान्स्फर आउट’ (बाहेर हस्तांतरित) म्हणजे कोरोना निगा केंद्रात पाठविण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 79 टक्के आहे. आता गोमेकॉत कोविड विभाग सुरू करण्यात आला असून या हॉस्पिटलावरील ताण जरा कमी झालेला आहे. कोविड हॉस्पिटलातील चार डॉक्टर तसेच काही परिचारीका तसेच इतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झालेत. त्यातून बरे झाल्यानंतर पुन्हा आपल्या सेवेत रूजू झालेले आहेत.
काल दिवसभरात एकूण 20 रुग्ण नव्याने दाखल झाले. तर 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 196 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत.