बेंगळूर / प्रतिनिधी
कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून, कर्नाटक काँग्रेसने रविवारी रामनगरा जिल्ह्यातील संगमा येथे मेकेडाटू प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी एक विशाल पदयात्रा काढली. पदयात्रेच्या आधी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी नदीला प्रार्थना केली आणि पेयजल प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी रॅलीचे नेतृत्व केले.
‘नम्मा नीरू, नम्मा हक्कू’ (आमचे पाणी, आमचा हक्क) या पदयात्रेचा कालावधी 9 जानेवारी ते 19 जानेवारी असून ती एकूण 154.5 किमीचे अंतर पार करून बसवनगुडी येथील नॅशनल कॉलेजच्या मैदानावर समाप्त होईल. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पदयात्रेचे उद्घाटन केले विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, याचबरोबर धार्मिक क्षोत्रातील प्रमुख आणि कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवकुमार यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना पदयात्रा रोखण्यासाठी सरकारवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचा आरोप केला. “राज्यात 26 धरणे आहेत. एक म्हैसूर महाराजांनी बांधली, पाच ब्रिटिशांनी आणि 20 काँग्रेसने बांधली आहेत,” तसेच काँग्रेस कर्नाटकातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भाजप आणि जेडी(एस) यांच्याशी नेहमीच लढत आली आहे असेही ते म्हणाले.