सोशल मीडियावरून गैरसमज पसरविण्याचे प्रकार
प्रतिनिधी / मडगाव
डॉक्टर हे आजारी माणसांवर उपचार करण्यासाठी असतात, त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करावी लागते. यामुळे डॉक्टर अनेकांच्या संपर्कात येतात. अशा वेळी त्यात एखादी कोरोना बाधित व्यक्ती असू शकते आणि कोरोनाची लक्षणे असल्यास स्वॅब चाचणीतून ती स्पष्ट होत असते. अशा वेळी ज्या डॉक्टराने तपासणी केली, त्या डॉक्टर बद्दल समाजात गैरसमज पसरविण्याचे प्रकार गोव्यात घडू लागल्याने गोव्यातील तमाम डॉक्टर सद्या प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत. खुद्द डॉक्टरांनीच काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
एखाद्या डॉक्टराकडे येणारा रूग्ण हा कोणत्या आजाराचा असतो हे वैद्यकीय निदान केल्यानंतरच स्पष्ट होत असते. कोरोना सदंर्भात सुद्धा तसेच आहे. एखाद्यी व्यक्ती डॉक्टराकडे आली तर तिची तपासणी केल्याशिवाय आजारचे कारण स्पष्ट होत नाही. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला रूग्णांच्या जवळ जावेच लागते. तसेच कोरोना बाधिताच्या संदर्भात होत असते. त्यामुळे कोरोना बाधिताची तपासणी केलेल्या डॉक्टर व त्यांच्या इतर कर्मचाऱयांना कुणी छळू नये तसेच त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमांतून बदनामी करू नये असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा विभागाने केले आहे.
सद्या कोरोनाची बाधा डॉक्टरांना देखील झाली आहे. सुरवातीला मांगोरहिल-वास्को येथील डॉक्टर व मंगळवारी कुडतरी येथील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे डॉक्टर सुद्धा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस व पत्रकार हे कोरोनाचे वॉरियर्स म्हणून बघितले जातात. अशावेळी त्यांच्या संदर्भात सोशल मीडिया व वृत्तपत्रे यांनी बातम्या देताना संवेदनशील असले पाहिजे असे आयएमचे गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. सॅम्युएल एस म्हणाले.
अफवामुळे रात्रीची झोपच उडाली
बेती-वेरे येथील डॉ. विनोद साळकर म्हणाले की, आपल्याकडे मलेरियाचा रूग्ण आला होता व त्याची चाचणी केल्यानंतर तो मलेरीया सकारात्मक निघाला. नंतर त्याला गोमेकॉत पाठविण्यात आले. गोमेकॉत त्याची कोरोनासाठी चाचणी घेण्यात आली ती पॉझिटिव्ह निघाली. नंतर या व्यक्तीला कोविड हॉस्पिटलात भरती करण्यात आले. हा रूग्ण सुरवातीला जेव्हा आला होता. त्यावेळी त्याचे मलेरीया निदान झाले होते. नंतर गोमेकॉत तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या रूग्णाच्या संपर्कात आपण आलो, त्यामुळे आपण कोरोना पॉझिटिव्ह झालो असा त्याचा अर्थ होत नाही. पण, कोणत्याच गोष्टीची खातरजमा न करता आपल्या संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविण्यात आल्या. आपल्या क्लिनिकमधील कर्मचाऱयांना ही सतावण्यात आले. रात्री-अपरात्री त्यांच्या घरी भेट देऊन त्यांनाही मानसिक त्रास देण्यात आला. या सर्व प्रकारानंतर आपण विलगीकरणात राहिलो व कोरोना संदर्भात चाचणी घेतली असता, आपला अहवाल निगेटिव्ह आला. त्याच बरोबर आपल्या कर्मचाऱयांचा देखील. मात्र, ज्या पद्धतीने अफवा पसरविण्यात आल्या, त्यातून नातेवाईकांसह अनेकांकडून फोन येऊ लागले. गेले कित्येक दिवस आपण मानसिक तणाव सहन करीत आहे. आपली रात्रीची झोप सुद्धा उडाल्याचे डॉ. साळकर या प्रसंगी म्हणाले.
अन् डॉ. शेखर साळकर झाले भावूक
डॉ. शेखर साळकर यांची मुलगी दिल्लीवरून गोव्यात आली होती. स्वताच्या मुलीची गळा भेट घेता आली नाही. पुन्हा दिल्लीला जातानाही तिला कवेत घेता आले नाही. स्वताच्या कुटूंबियांपासून डॉक्टरांना सुद्धा दूर रहावे लागते असे सांगत असताना डॉ. शेखर साळकर यांच्या डोळय़ात अश्रू उभे राहिले. कोविड-19 ही पाळी सर्वावरच आणली आहे. आपल्या डिचोलीतील क्लिनिक मध्ये नर्सेस कामाला येत नाही, रिसेप्शनिस्ट येत नाही. त्यामुळे सर्व कामे स्वताच करावी लागतात. आज लोक स्वताहून लॉकडाऊन पुकारतात. तसेच जे कोरोना बाधित आहेत, त्याच्याकडे अस्पृश्य म्हणून पाहिले जाते. हे प्रकार बंद व्हायला पाहिजे असे ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळापासून काही डॉक्टरांनी अखंडितपणे सेवा पुरविली आहे. डॉक्टर स्वता मास्क व हात मोजे वापरतात तर शस्त्रक्रियेवेळी पीपीई किट वापरतात तरी सुद्धा त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतोच. त्यामुळे डॉक्टराकडे संवेदनशील नजरेने पाहिले पाहिजे. डॉक्टर बजावत असलेल्या कामगिरीचा मान राखला पाहिजे, त्याचे खच्चीकरण करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या वेळी डॉ. सुधीर शेट्टी, डॉ. शलैश कामत, डॉ. अरविंद आल्मेदा, डॉ. राजेश नाईक, डॉ. सुजय दास, डॉ. रिबेलो, डॉ. श्रीराम धाकणकर व डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी आपले विचार मांडले.