इंटास फार्माकडून मानवी फ्लाज्माद्वारे औषधाची निर्मिती : पुढील महिन्यापासून मानवी परीक्षण
अहमदाबाद येथील इंटास फार्मास्युटिकल या औषध निर्मिती कंपनीने कोरोना रुग्णांसाठी प्लाज्मा थेरपीचा पर्याय ठरणारे एक औषध विकसित केले आहे. हे औषध घेतल्यावर कोरोनाबाधितांना प्लाज्मा थेरपीची गरज भासणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे औषध मानवी प्लाज्माद्वारे तयार करण्यात आले आहे.
मानवी चाचणीला मंजुरी
देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचे औषध तयार केले जात असल्याची माहिती इंटास फार्मास्युटिकलचे चिकित्सा आणि नियामक प्रमुख डॉ. आलोक चतुर्वेदी यांनी दिली आहे. कोविड-19 च्या उपचारासाठी विशेष स्वरुपात विकसित हायपरइम्यून ग्लोब्युलिनच्या मानवी परीक्षणासाठी ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडून (डीजीसीआय) मंजुरी मिळाली आहे. आम्ही या परीक्षणासाठी गुजरात तसेच अन्य राज्यांमधील रुग्णालयांशी चर्चा करत आहोत. पुढील एक महिन्यात परीक्ष सुरू होणार असल्याचे चतुर्वेदी म्हणाले.
30 एमजीचा डोस पुरेसा
डॉ. चतुर्वेदी यांच्यानुसार सद्यकाळात कोरोनाबाधितांना सुमारे 300 एमजी प्लाज्मासह प्लाज्मा थेरपी दिली जाते. तसेच प्रत्येक रुग्णाला ती कशाप्रकारे आणि कितीप्रमाणात प्रभावित करत हे ही स्पष्ट नाही. नव्याने तयार होणाऱया हायपरइम्यून ग्लोब्युलिनचा 30 एमजीचा एक डोस बाधितासाठी पुरेसा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये यश
औषधावर आतापर्यंतचे परीक्षण यशस्वी राहिले आहे. हे औषध मानवी प्लाज्माने तयार करण्या आल्याने त्याचे निष्कर्ष परीक्षणाच्या एका महिन्याच्या आत मिळण्याची अपेक्षा आहे. परीक्षण यशस्वी ठरल्यास पुढील 3 महिन्यांमध्ये औषध बाजारात आणण्याची तयारी आहे. उत्पादनासाठी आवश्यक अनुमती घेण्यासाठी एक महिन्याचा काळ लागणार असल्याचे डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले आहे.
प्लाज्मा थेरपी
कोरोना संसर्गातून अलिकडेच बरे झालेल्या व्यक्तींच्या शरीरात इम्युन सिस्टीममध्ये अँटीबॉडीजची निर्मिती होते. या अँटीबॉडीज ब्लड प्लाज्मामध्ये असतात. त्यांना औषधामध्ये रुपांतरित करण्यासाठी ब्लडमधून प्लाज्मा वेगळा केला जातो आणि नंतर त्यातून अँटीबॉडीज प्राप्त केल्या जातात. या अँटीबॉडीज नव्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केल्या जातात. शरीर स्वतःहून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास योग्य ठरेपर्यंत या अँटीबॉडीज रुग्णाच्या शरीराला रोगांपासून लढण्याची क्षमता प्रदान करतात.
फ्रान्स, मॉस्कोमध्ये कोरोना संकट तीव्र
जगभरात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 2 कोटी 49 लाख 37 हजार 294 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 73 लाख 15 हजार 810 बाधितांना ंसंसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. तर 8 लाख 41 हजार 870 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. फ्रान्समध्ये संसर्गाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. तेथे दिवसभरात 7 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. रशियाच्या मॉस्कोमध्ये कोरोनाबळींचा आकडा वाढला आहे. तेथील सरकार आता आणखी एक रुग्णालय उभारत आहे.
मॉस्कोतच संकट
मॉस्को वगळता रशियाच्या उर्वरित भागांमध्ये बऱयाचअंशी संसर्गावर नियंत्रणावर मिळविण्यात आले आहे. परंतु मॉस्कोतील स्थिती सुधारण्याची चिन्हे अद्याप नाहीत. मॉस्कोत दिवसभरात 12 बाधितांचा मृत्यू झाला असून 5 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. मॉस्कोच्या उपनगरीय भागांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने तेथे 5 हजार बेड्सची क्षमता असलेले रुग्णालय निर्माण केले जात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
युएई : नवे रुग्ण
आयपीएल 2020 संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, परंतु त्यापूर्वीच देशातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दिवसभरात तेथे 390 रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या आता 68 हजार 901 झाली आहे. सरकारने शनिवारी एक महत्त्वाची बैठक घेतली असून यात आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सामील झाले आहेत. सरकार काही क्षेत्रांमध्ये टाळेबंदीसदृश पाऊल उचलू शकते.
पाकिस्तान : शाळांना मंजुरी
पाकिस्तानच्या शैक्षणिक संस्थांना सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू करण्याची तयारी आहे. देशात कोविड-19 संसर्ग नियंत्रणात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 24 तासांमध्ये देशात संसर्गामुळे केवळ एकाचा बळी गेला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 6,284 जणांना महामारीमुळे जीव गमवावा लागला आहे. तर दिवसभरात तेथे 319 नवे बाधित सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 2 लाख 95 हजारांवर पोहोचली आहे.
टाळेबंदी हटविणे महागात
युरोपीय देशांमध्ये फ्रान्स येथेच कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. दिवसभरात तेथे 7 हजार 379 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर चालू आठवडय़ातील नव्या रुग्णांच संख्या सुमारे 22 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. फ्रान्स सरकारने संसर्गाचा वेग रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. अधिक रुग्ण सापडत असलेल्या क्षेत्रांमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू केली जाऊ शकते. परंतु नवे क्लस्टर अधिक दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे.
वुहान : शाळा सुरू
कोरोना विषाणूचे उगमस्थान मानले गेलेल्या चीनच्या वुहान शहरात मंगळवारपासून मुलांच्या शाळा आणि किंडरगार्टन सुरू केल्या जाणार आहेत. स्थानिक प्रशासनाने यासंबंधीची माहिती दिली आहे. वुहान शहरातील 2,842 शैक्षणिक संस्था सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या जाणार आहेत. वुहान विद्यापीठ यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन योजना तयार करत योग्य ती खबरदारी घेतली आहे.