ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर आता कोवॅक्सिन या भारत बायोटेक या कंपनीच्या लसींचे दरही कमी करण्यात आले आहेत. कोवॅक्सिनचा दर आता 200 रुपये कमी करण्यात आला आहे. ही लस आता राज्य सरकारांना 400 रुपये प्रति डोस या किंमतीने मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा वाढीव दर जाहीर केला होता. त्यानुसार राज्य सरकारांना कोवॅक्सिन 600 रुपये प्रति डोस तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपये प्रति डोस या किंमतीला मिळत होती. मात्र आता यामध्ये घट करण्यात आली आहे.
राज्य सरकारांना आता कोवॅक्सिन 600 ऐवजी 400 रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे. खासगी रुग्णालयांना मात्र या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे 1200 रुपये प्रति डोस ही किंमत मोजावी लागणार आहे.
भारत बायोटेकने एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकात भारत बायोटेकने म्हटले की, सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन आम्ही आता कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारांना 400 रुपये प्रति डोस या किंमतीने देणार आहोत, असे म्हटले आहे.