ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ या दोन्ही लसींच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन्ही कंपन्या वारंवार दरवाढीची मागणी करत होत्या. त्यामुळे ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे 66 कोटी डोस नवीन दराने खरेदी केले जातील. आतापर्यंत हे डोस 150 रुपये प्रति डोस दराने खरेदी केले जात होते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्डचे 37.5 कोटी डोस आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे 28.5 कोटी डोस खरेदी केले जातील. हे 66 कोटी अधिक डोस अनुक्रमे 205 रुपये आणि 215 रुपये प्रति डोस दराने खरेदी केले जातील, त्यामध्ये कराचा समावेश नसेल. करांसह कोविशिल्डची किंमत प्रति डोस 215.25 रुपये आणि कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस 225.75 रुपये असेल.