ऑनलाईन टीम / पुणे :
देशात 1 मे पासून कोरोनावरील लसीकरण मोहीमेचा तिसरा टप्पा सुरू होतोय. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. अशातच एक चांगली बातमी आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोविशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे. राज्य सरकारांसाठी ही किंमत कमी करण्यात आली आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करून दिली आहे.
आदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, कोविशील्ड लसीच्या किंमती कमी करत आहोत. राज्य सरकारासाठी कोविशील्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरुन 300 रुपये करत आहोत. लसीच्या कमी केलेल्या किमती तात्काळ लागू होतील. कोविशील्डच्या लसीची किंमत कमी केल्याने देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल. तसेच राज्यांचा कोट्यवधींचा निधी वाचणार आहे, असेही पुनावाला म्हणाले.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड लशीची किंमत निश्चित केली होती. एसआयआयने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली होती.