हॉकी इंडियासह खो-खो, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ऍथलेटिक्स महासंघांनी केली मदत, विविध राज्यांतील क्रीडा संघटनांही सरसावल्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी समाजातील अनेक क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा जबरदस्त फटका बसला असून अनेक मोठय़ा क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. या कठीण काळात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, खासदार गौतम गंभीरसह देशभरातील बीसीसीआय, हॉकी इंडिया, भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन यांच्यासह अनेक अनेक क्रीडा संघटना कोरोनाविरुद्ध लढय़ात पंतप्रधान आणि स्थानिक मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करत आहेत. रविवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेतंर्गत येत असलेल्या अनेक संघटनांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी पुढाकार घेतला आहे.
सध्याच्या घडीला देशात कोरोनाने थैमान घातले असून रोज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. या संकटमय काळात कोरानाचा मुकाबल करण्यासाठी पंतप्रधान व राज्य सरकारच्या मदतनिधीसाठी प्रत्येक जण आपल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने देखील पुढाकार घेत 71 लाख रुपयांचा निधी पंतप्रधान सहायता निधीसाठी दिला आहे. याशिवाय, देशातील मोठी क्रीडा संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 51 कोटी तसेच हॉकी इंडियाने 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
देशातील नामांकित क्रीडा संघटनाही सरसावल्या
देशातील नामांकित अशा भारतीय ऑलिम्पिक महासंघानेही आपले सामाजिक कर्तव्य जपताना 71 लाखांची मदत पंतप्रधान केअर फंडसाठी शुक्रवारी जाहीर केली. आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. देशाच्या कठीण काळात भारतीय ऑलिम्पिक महासंघ नेहमी अग्रेसर राहिला आहे. देशासाठी आणि नागरिकासाठी जे काही करता येणे शक्य आहे, ते आम्ही करत आहोत, या शब्दात मेहता यांनी आपल्या भावना मांडल्या.
याशिवाय, भारतीय ऑलिम्पिक संघटनेतंर्गत येणाऱया संघटनांनाही त्यांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यानुसार, भारतीय खो-खो महासंघ, भारतीय टेनिस संघटना, भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन, भारतीय जलतरण महासंघ, वुशु संघटना, बॉक्सिंग फेडरेशन, हँडबॉल महासंघ, हॉकी इंडिया, टेबल टेनिस फेडरेशन यांनी पुढाकार घेत पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत केली आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, मेघालय व सिक्कीम राज्य ऑलिम्पिक संघटनांनी देखील मदत करत आपले योगदान दिले आहे. देशाच्या कठीण प्रसंगाच्या काळात क्रीडा संघटनांनी पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले आहे.
देशातील अन्य क्रीडा संघटना
क्रीडा संघटना केलेली मदत
1. कराटे असोशिएशन 5 लाख
2. आयओएस स्पोर्ट्स 2.50 लाख
3. किकबॉक्सिंग फेडरेशन 1 लाख
4. महाराष्ट्र तलवारबाजी संघटना 1 लाख
5. तामिळनाडू खो खो संघटना 1 लाख.
देशभरातील क्रीडा संघटनांनी केलेली मदत
क्रीडा संघटना केलेली मदत
1. भारतीय खो-खो फेडरेशन 11 लाख
2. बॉक्सिंग फेडरेशन 11 लाख
3. भारतीय गोल्फ संघटना 10 लाख
4. भारतीय बॅडमिंटन महासंघ 10 लाख
5. टेबल टेनिस फेडरेशन 5 लाख
6. तलवारबाजी असोशिएन 5 लाख
7. व्हॉलिबॉल फेडरेशन 5 लाख
8. टेबल टेनिस असोशिएशन 2.50 लाख
9. वुशु असोशिएन 2.50 लाख
10. हँडबॉल फेडरेशन 1.50 लाख
11. सायकलिंग फेडरेशन 1 लाख
12. वेटलिफ्टिंग फेडरेशन 1 लाख
13. नेटबॉल फेडरेशन 1 लाख
14. ज्युदो असोशिएशन 1 लाख
15. स्क्वॅश फेडरेशन 1 लाख
16. ट्रयथ्लॉन फेडरेशन 1 लाख
17. जलतरण महासंघ 51 हजार