सिडनी / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी उठवली असून ऑस्ट्रेलियाच्या सीमा निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. तसेच आता ऑस्ट्रेलियातील थेरपीटिक गुड्स ऍडमिनिस्ट्रेशनने भारतात निर्मिती होत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता दिली आहे. तसेच चीनमध्ये बनवलेल्या सिनोव्हाक लसीलाही हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार आता कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतलेल्यांना आता ऑस्ट्रेलियामध्ये थेट प्रवेश मिळू शकेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियामध्ये फायझर, ऍस्ट्राझेनेका, मॉडर्ना आणि जॉन्सनच्या लसीला यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे.