45 वर्षांवरील लाभार्थींसाठी वेगळा विचार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार नजिकच्या काळात कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या कोव्हिशिल्डच्या दोन लसींमध्ये किमान 84 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. तथापि, आता सर्वांसाठीच दोन डोसमधील अंतर कमी न करता केवळ 45 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठीच अंतर कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोविड-19 कृती गटाचे अध्यक्ष डॉ एन. के. अरोरा यांनीच यासंबंधीचे संकेत दिले आहेत. दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा हा निर्णय पुढील दोन ते चार आठवडय़ांत घेतला जाऊ शकतो.
सर्व लाभार्थींसाठी कोव्हिशिल्डच्या डोसमधील सध्याचे अंतर 12 ते 16 आठवडे आहे. भारतात लसीकरण मोहिमेच्या अगदी सुरुवातीला कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये शिफारस केलेले अंतर 4-6 आठवडे होते. मोहीम सुरू झाल्यानंतर काही दिवसातच ते 4 ते 8 आठवडय़ांपर्यंत आणि नंतर 12 ते 16 आठवडय़ांपर्यंत वाढवले गेले होते. 84 दिवसांपर्यंत अंतर वाढवण्याच्या निर्णयावर बरीच टीका करण्यात आली होती. मात्र, सरकारने वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसारच यासंबंधीचा निर्णय घेतला होता.