डब्ल्यूएचओची यादी ठरली कारणीभूत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत बायोटेक आणि आयसीएमआरकडून विकसित स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ची लस घेणाऱ्यांना विदेश प्रवास करताना अडचणी येऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या इमर्जन्सी यूज लिस्टिंग म्हणजेच ईयुएलमध्ये सामील नसल्याने अन्य देशांमध्ये प्रवेश करण्याप्रकरणी अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. अनेक देशांनी लसप्राप्त प्रवाशांसाठी धोरणांची घोषणा केली आहे. तर काही देश लवकरच नियमांची घोषणा करणार आहेत.
स्वतःच्या नियामकांकडून मंजुरी मिळालेल्या किंवा डब्ल्यूएचओच्या यादीत सामील असलेल्या लसींनाच अनेक देश अनुमती देत आहेत. सध्या या यादीत सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, मॉडर्ना, फायजर, ऍस्ट्राजेनेका (2), जेनसेन (अमेरिका आणि नेदरलँड्स) आणि सिनोफार्म/बीबीआयपीचे नाव सामील आहे.
संघटनेने आतापर्यंत कोव्हॅक्सिनला ईयुएलमध्ये सामील केलेले नाही. डब्ल्यूएचओच्या दिशानिर्देशांनुसार भारत बायोटेकने एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट सादर केले आहे, पण यासंबंधी अद्याप अधिक माहितीची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. मे-जून महिन्यात बैठक होणार असून त्यानंतर कंपनीला एक डोजियर सादर करावे लागणार असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. हे डोजियर स्वीकारण्यात आल्यावर कोव्हॅक्सिनला स्वतःच्या यादीत सामील करण्यापूर्वी डब्ल्यूएचओकडून अध्ययन केले जाणार आहे. त्यानंतर लसीचा ईयुएलमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. लस ईयुएलमध्ये नसल्यास किंवा विदेशात त्याला मंजुरी न मिळाल्यास प्रवाशाला लसप्राप्त मानले जाणार नाही. सध्या भारतात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डला अनुमती मिळाली आहे. याचबरोबर रशियन लस स्पुतनिक-व्ही देखील वापरासाठी तयार आहे. ही लस लवकरच बाजारात व्यापक प्रमाणात उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.