जायंट्स मेनच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन
प्रतिनिधी / बेळगाव
जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्यावतीने कोव्हॅक्सिन लसीच्या टंचाईबाबत जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांची भेट घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी कोव्हॅक्सिन लस पुढील आठवडय़ापर्यंत उपलब्ध होईल, असे आश्वासन दिले आहे.
गेल्या सात आठवडय़ांपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हात हलवत परतावे लागत असल्याने जायंट्स मेनच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार यांची भेट घेऊन ही समस्या मांडली.
यावेळी डॉ. हरिशकुमार यांनी जेवढे जास्त दिवस होतील तितकी प्रतिकार शक्ती वाढेल. त्यामुळे घाबरून जायचे कारण नसून सोमवारनंतर कोव्हॅक्सिन पुरवठा सुरळीत होईल आणि दुसरा डोस घेणाऱयांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी संजय पाटील, विशेष समितीचे सदस्य मदण बामणे, राजू बांदिवडेकर, राजू जैन, आनंद कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.