‘बादलों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की हार नहीं होती…’ अशाच काहीशा भावना अर्जेंटिना फुटबॉल संघाच्या आणि त्याचा कर्णधार लिओनेल मेसीच्या जगभरातील चाहत्यांची होती. मेसी कधी ना कधी यशस्वी होणार ही भावना घेऊन ते त्याचा खेळ पाहत होते. अर्जेंटिनाच्या बाजूने आपल्या सद्भावना व्यक्त करत होते. गेल्या पंधरा, सोळा वर्षातील मेसीचा खेळ बघून हा जगज्जेता आहे याची जगाला जाणीव झाली होती. पण 151 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 77 गोल नोंदवलेल्या, चारवेळा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि सहावेळा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत खेळूनही अंतिम सामन्यात विजय मिळवून चषक पटकावण्याचे त्याचे स्वप्न काही साकार होत नव्हते. यातील एक स्वप्नपूर्ती त्याने 11 जुलैच्या रात्री केली. कोपा अमेरिका चषकावर त्याने अर्जेंटिनाच्या नावाची पंधराव्यांदा नोंद केली. अर्जेंटिनाला गेली 28 वर्षे हुलकावणी देणाऱया कोपाने अखेर मेसीच्या तुफान खेळीवर प्रसन्न होत त्यांना यश बहा?ल केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परवाचा रविवार तसा सुपर संडे म्हणावा असाच होता. क्रीडाविश्वातील बऱयाच घडामोडी या दिवशी घडल्या. एक तर संपूर्ण जगाला कोविडने ग्रासले असताना इंग्लंडमध्ये होणाऱया युरो कप आणि महिला क्रिकेट स्पर्धेकडे जगाचे लक्ष होते. तसेच लॅटिन अमेरिकेतील कोपा चषकाकडेही होते. रविवारी कोपा चषकावर अर्जेंटिनाने नाव कोरले. भारत आणि इंग्लंड टी-20 महिला क्रिकेट सामना भारताने जिंकला आणि विम्बल्डनमध्ये जोकोविचने पराक्रम केला! जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी या एकाहून एक सरस अशा बातम्या होत्या. अर्जेंटिनाने पंधराव्यांदा जिंकून उरुग्वेबरोबर बरोबरी करत संयुक्तपणे प्रथम स्थानावर पोहोचण्यात यश मिळवले. ब्राझील आणि अर्जेंटिनातील हा सामना म्हणजे मेसी आणि नेयमार या दोन महान कर्णधारांमधील सरस कोण ठरणार हे ठरवणारा असल्याचेही म्हटले गेले होते. इतक्मया त्वेषाने तो सामना खेळला गेला. पण अर्जेंटिनाने सामना जिंकला म्हणून नेयमारने दिलेले आलिंगन आणि आपला मित्र हरल्यानंतर मेसीने त्याचे केलेले सांत्वन जगाने पाहिले. क्रीडाभावनेचा विजय झाल्याचे हे निदर्शक. जागतिक स्तरावर खेळणारे खेळाडू किती महान असतात याची चुणूक दाखवणारा हा प्रसंग मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी जेव्हा घरबसल्या अनुभवला असेल तेव्हा त्यांच्यातील कट्टरता आपोआपच विरघळली असेल. मैदानात बंदूक घेऊन येणारे प्रेक्षक एकीकडे आणि एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकाच्या यश आणि अपयशात सहभागी होतानाचे दृश्य एकीकडे, असा हा फुटबॉलचा महिमा ज्यांनी अनुभवला ते खरोखरच धन्य. यश-अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. अनेकदा चांगली कामगिरी करूनही प्रत्येकाला यश प्राप्त होतेच असे नाही. पण म्हणून आपल्यावर पडलेली जबाबदारी सोडून पळ काढायचा नसतो. प्रयत्न करत राहिले तर यश गवसणी घालतेच. या बाबतीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. मॅराडोनाने फुटबॉल विश्वचषक जिंकला आणि 1993 साली अर्जेंटिनाने कोपा चषक जिंकला. गेली 16 वर्षे आपल्या पदलालित्याने संपूर्ण जगाला अचंबित करणाऱया मेसीला 2006 पासून चार विश्वचषक आणि सहा कोपा चषक स्पर्धा खेळूनसुद्धा यश हुलकावणी देत होते. यादरम्यान कोपामध्ये 34 पैकी 21 सामने अर्जेंटिनाने जिंकले. पण, तीन वेळा अंतिम क्षणी हरले. मेसीकडे जेव्हा बॉल जायचा तेव्हा त्याला रोखण्यासाठी चार चार खेळाडू त्याच्या मागे पुढे असायचे. त्यांची भिंत पार करून, अप्रतिम पदलालित्याचे दर्शन घडवत, मेसी गोल करायचा. पण, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंतिम विजेतेपद त्याच्या संघाला मिळायचे नाही. गेली 28 वर्षे अर्जेंटिनाशी यश असे लपंडाव खेळत होते. कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1983 मध्ये लॉर्ड्सवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून जगाला अचंबित केले. पण 2011 सालापर्यंत म्हणजे नेमकी 28 वर्षेच भारतालाही क्रिकेट विश्वचषकाने हुलकावणी देण्याचे काम केले. फुटबॉलमध्ये मेसीप्रमाणेच क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला सुद्धा क्रिकेटचा देव मानले जात होते. तो खेळायला आला की विरोधी संघ क्षेत्ररक्षण बदलून त्याला रोखण्याचा प्रयत्न करायचा. मात्र तरीही सचिन शतकी खेळ खेळून सामना खिशात घालून परतायचा. पण त्याच्या कारकिर्दीची अखेर आली तरी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले होते. 2011चा विश्वचषक सचिनसाठी जिंकायचा असे ठरवून भारतीय संघ खेळला आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. सचिनच्या आयुष्यातील हे महत्त्वाचे यश त्याला प्राप्त झाले. त्याला खांद्यावर घेऊन मैदानावर फेरी काढण्यात आली. रविवारी मेसीलासुद्धा अर्जेंटिनातील संघ सहकाऱयांनी असेच हवेत फेकून झेलले आणि आपल्या या महान खेळाडूला अनोखी मानवंदना दिली. आयुष्यात सातत्याने हुलकावणी देणारे यश एकदाचे प्राप्त झाले. जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष युरो चषकाच्या निमित्ताने पोर्तुगालच्या रोनाल्डोकडेही होते. आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचे त्याचे स्वप्न यावेळीही भंगले. एकाचवेळी युरो आणि कोपा स्पर्धा होत होत्या. पण, पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीतच बाहेर पडला. त्यामुळे मेसीच्या चाहत्यांच्या छातीतही धस्स झाले होते. पण मारियाने 22 व्या मिनिटाला ब्राझीलचा गोलरक्षक मोरेसला चुकवले आणि एक अप्रतिम गोल केला. मारियाचा हा या स्पर्धेतील पहिलाच गोल. त्याला फुटबॉलच्या इतिहासात अजरामर करणारा ठरणार आहे. मेसीच्या यशाचे जेव्हा जेव्हा गुणवर्णन केले जाईल, तेव्हा तेव्हा मारियाच्या या गोलचीही आठवण जगाला काढावी लागेल. कोविडमुळे निराश झालेल्या जगात प्राण फुंकण्याचे काम या क्रीडा स्पर्धानी केले आहे. पाठोपाठ ऑलिंपिक स्पर्धा येत आहे. मेसीने आपल्यावरील कलंक धुऊन काढला असला तरी आता त्याने ऑलिंपिकला सुवर्णपदक पटकवावे आणि 2022 चा विश्वचषक अर्जेंटिनाला मिळवून द्यावा अशीच फुटबॉलप्रेमींची भावना झाली आहे.
Previous Articleसोन्याची पावलं उमटली कलर्स मराठीवर
Next Article सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसींचा समावेश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.