हायवेच्या बॉक्सेल ब्रिजच्या पाहणीअंती स्वतंत्र अभियंत्याचा अहवाल : हायवेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून प्रांताधिकाऱयांकडे खुलासा : अनेक धक्कादायक बाबी समोर
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरातील कोसळलेल्या व तडे गेलेल्या बॉक्सेल ब्रिजच्या भिंतीच्या पुनर्बांधणीचा कायमस्वरुपी उपाय स्वतंत्र अभियंत्यांच्या पाहणी अहवालात नमूद करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी प्रांताधिकाऱयांना केलेल्या खुलाशात म्हटले आहे. त्यामुळे आता याबाबत कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या मागणीबाबत काय कार्यवाही होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कणकवलीतील बॉक्सेल ब्रिज कोसळल्यानंतर नागरिकांकडून पोलिसांत ठेकेदार व कन्सल्टंन्ट कंपनीविरोधात तक्रार देण्यात आली होती. त्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षकांनी याबाबत प्रांताधिकाऱयांना पत्र दिले होते. त्यानुसार प्रांताधिकाऱयांनी अंतरिम आदेश दिले होते. अंतरिम आदेशात कार्यकारी अभियंता व ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनला अंतरिम आदेश कायम का करू नयेत, याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.
कामाची जबाबदारी 15 वर्षे ठेकेदार कंपनीची
त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांमार्फत खुलासा प्रांताधिकाऱयांकडे सादर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे, 9 फेब्रुवारी 2017 च्या करारानुसार व 1 फेब्रुवारी 2018 च्या कार्यारंभ आदेशानुसार दिलीप बिल्डकॉनला कलमठ ते झारापपर्यंतच्या चौपदरीकरण कामाचे आदेश देण्यात आले आहेत. या कामाची जबाबदारी 15 वर्षे ठेकेदार कंपनीची आहे. या कामाबाबत महत्वाच्या बाबींवर लक्ष ठेवणे व त्या अनुषंगाने कामाची जबाबदारी स्वतंत्र अभियंता आरटी फॅक्ट प्रोजेक्ट लि. या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. त्यासाठी त्या कंपनीकडे 21 अभियंत्यांची प्रत्यक्ष कामावर व 11 तज्ञ अभियंत्यांची त्यांच्या मुख्य कार्यालयात नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण समन्वयक
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची जबाबदारी ही केंद्र शासन व उद्योजक यांच्यात समन्वय साधण्याची आहे. भूसंपादनासाठी मदत करणे, ठेकेदार कंपनीच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करणे, केंद्र शासनाकडे या कामाबाबत पत्रव्यवहार करणे, स्वतंत्र अभियंत्याने शिफारस केलेले विविध प्रस्ताव सादर करणे आदी कामे प्रशासकीय स्वरुपाची कामे महामार्ग प्राधिकरणकडून करण्यात येतात. कणकवलीत बॉक्सेल ब्रिजला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठेकेदार व स्वतंत्र अभियंता यांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे कळविण्यात आले होते.
दुर्घटना घडल्यास जबाबदारी ठेकेदाराची
या बाबत दोन दिवसांत पावले उचलली न गेल्याने पुन्हा जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. तसेच दुर्घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदाराची राहील हे निदर्शनास आणण्यात आले होते. सुरक्षेच्यादृष्टीने सेफ्टी कन्सल्टंन्ट यांच्याकडून कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत अहवाल मागविण्यात आला होता. या तज्ञांकडून 20 जून रोजी मिळालेल्या अहवाल / सूचना ठेकेदार व स्वतंत्र अभियंता यांना पाठविण्यात आल्या होत्या.
आर्थिक दंड का करू नये?
1 जुलै रोजी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत भिंतीच्या होणाऱया पुढील हानीबाबत 24 तास निरीक्षण ठेवण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बॉक्सेल ब्रिजचा भाग कोसळल्यानंतर अधीक्षक अभियंता यांच्याकडून कामात कुचराई केल्याबद्दल स्वतंत्र अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आर्थिक दंड का करू नये, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. या कामाची ठेकेदारासोबतच आरटी फॅक्ट कंपनीची काम करून घेण्याची तेवढीच जबाबदारी असल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून प्रांताधिकाऱयांकडे देण्यात आलेल्या खुलाशात स्पष्ट करण्यात आले आहे.