राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार महामंडळाकडून दुरुस्ती : गांधीनगर परिसरात वाहनधारकांना अडथळा
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय महामार्गाशेजारी गांधीनगर परिसरात सर्व्हिस रस्त्याला घालण्यात आलेली भिंत कोसळली आहे. कित्येक महिन्यांपासून भिंत हटविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला होता. अखेर कोसळलेल्या भिंतीची माती हटविण्यासाठी बुधवारी मुहूर्त मिळाला आहे. रस्त्यावर पसरलेला मातीचा ढिगारा हटविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येण्यासाठी सोडण्यात आलेल्या सर्व्हिस रस्त्याशेजारील भिंत गांधीनगरजवळ कोसळली आहे. महामार्गाशेजारी बांधण्यात आलेली भिंत कोसळल्याने माती रस्त्यावर पसरली आहे. सदर भिंत कोसळून कित्येक महिने झाले मात्र दुरुस्तीच्यादृष्टीने कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. 100 फूट लांबीची भिंत कोसळली असल्याने या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. भिंत कोसळल्याने नागरिकांना समजण्यासाठी बॅरिकेड्स ठेवण्यात आले आहेत. पण हा रस्ता अरुंद असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना अडचण निर्माण होते. अशातच भिंत कोसळून रस्त्यावर पडल्याने अवजड वाहनांना अडचणीचे ठरत आहे. माती घसरून महामार्गावरून जाणाऱया वाहनधारकांना अपघात होण्याची शक्मयता आहे.
या समस्येबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या वृत्ताची दखल घेवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार महामंडळाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याशेजारी कोसळलेल्या भिंतीसह माती हटविण्याचे काम बुधवारी हाती घेण्यात आले. लवकरच भिंतीचे बांधकाम करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली.