वार्ताहर/ ताम्हाने
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळेवाडी येथील सुधीर गजानन सोलकर या तरुणाला तडीपार करण्यात आल्याची माहिती देवरुख पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी त्याला सहा महिन्याचा तडीपारीचा आदेश दिला आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर याच्यावर 2014 साली भा. द. वि. कलम 307 व 504अन्वये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्याला पाच वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली होती. यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये दाखल गंभीर गुह्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सुधीर विरोधात मारामारी, शारीरिक दुखापती करणे असे गुन्हे दाखल आहेत. या कृत्यामुळे परिसरातील लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत सुधीर याच्याविरोधात तडीपाराचा आदेश काढण्यात आला आहे.