दुबई : आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्याला सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड केली जाते. या मासिक पुरस्कारासाठी आता भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली तसेच महिला विभागात जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत कोहलीने फलंदाजीत सातत्य राखताना तीन अर्धशतके झळकविली. तसेच तो आता टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज बनला आहे. या स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात कोहलीची फलंदाजी निर्णायक ठरली होती. या कामगिरीमुळे मासिक सर्वोत्तम पुरस्कारासाठी कोहलीची शिफारस करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनेही या स्पर्धेत दर्जेदार फलंदाजी केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात मिलरची खेळी निर्णायक ठरली होती. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार झाली आहे. सिकंदर रझाने आयसीसीतर्फे ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविला होता. आता तो दुसऱयांदा या पुरस्काराच्या शर्यतीत उतरला आहे. आयसीसीच्या सर्वोत्तम मासिक क्रिकेटपटू पुरस्कारासाठी पहिल्यांदाच कोहलीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये कोहलीने 205 धावा जमविल्या आहेत. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याने हॉलंडविरुद्ध नाबाद 62 तर पाकविरुद्ध त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली होती.
महिलांच्या विभागात भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविले होते. भारताच्या जेतेपदामध्ये रॉड्रिग्ज आणि शर्मा यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. या स्पर्धेमध्ये रॉड्रिग्जने सर्वाधिक धावा जमविल्या.