अमिताभ बच्चन यांना चूक दुरुस्त करण्याचे आवाहन
सांगली / प्रतिनिधी
कौन बनेगा करोडपती ह्या प्रसिद्ध टेलिव्हिजनशो मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्कार प्रयोग दाखवण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्या समोर हा कथित चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी ह्या गोष्टीचे कौतुक केल्यामुळे एक अत्यंत चुकीच्या आणि भोंदूगिरीच्या गोष्टीचा प्रचार समाजात केला गेला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ह्या घटनेला जोरदार आक्षेप घेतला आहे. महा अंनिस मार्फत कथित चमत्काराच्या मागची हातचलाखी दाखवणारा व्हिडियो रिलीज करण्यात आला आहे. महानायकाने चूक दुरूस्त करावी, असे आवाहन अंनिसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अंनिसने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून वाचन करणारे महा अंनिसचे कार्यकर्ते दाखवण्यात आले आहेत. विज्ञानच्या नावाखाली केल्या जाणार्या भोंदुगिरीला पालकांनी बळी पडू नये, तसेच कौन बनेगा करोडपती ह्या शो ने घडलेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रत्यक्षात ह्या कथित चमत्काराच्या मागचे विज्ञान आपल्या पुढच्या शो मधून लोकांच्या समोर दाखवावे, असे आवाहन देखील ह्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली चूक दुरुस्त करावी आणि अशा अवैद्यानिक गोष्टींना आपल्या शो मध्ये थारा देवू नये, असे देखील आवाहन ह्या वेळी करण्यात आले आहे.
ह्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे कि, डोळ्यावर पट्टी बांधून गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात तसेच अनेक राज्यांच्या मध्ये मुलांचे मिड ब्रेन अक्टीव्हेशन करून त्यांचा बुध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढवतो, असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गांचे पेव फुटले आहे.
मिड ब्रेन(मध्य मेंदू)चे उद्दीपन केल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून देखील मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात, सा दावा मिड ब्रेन अक्टीव्हेशनच्या जाहिरातींमधून केला जातो. विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो, ह्या भूल थापेला बळी पडून अनेक पालक हजारो रुपये ह्यामध्ये खर्च करत आहेत, हे सर्व थांबवणे आवश्यक आहे, असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे.
डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांच्यामध्ये जी जागा राहते, त्यामधून बघून गोष्टी ओळखल्या जातात. जर हाताने दाब देवून डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यावर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर ह्या गोष्टी ओळखाता येत नाहीत हे महा अनिसने अनेक वेळा सिद्ध केले आहे.
आजूबाजूला पूर्ण अंधार करून अथवा डोक्याच्या मागच्या बाजूला वस्तू धरली असता मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसेच अंध मुलांना देखील मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे कितीही प्रशिक्षण दिले तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाही, हे देखील पत्रकात नमूद केले आहे.